स्थैर्य, सातारा, दि. १९ : कोरोना विषाणूच्या संकटामध्ये लॉकडाऊन झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा ‘रोल, कॅमेरा, ॲक्शन’साठी सज्ज झाली आहे. थांबलेल्या चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग आता पुन्हा सुरू होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याने पुढाकार घेत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काही नियम आणि अटींसह चित्रीकरणास परवानगी दिली आहे. विशेष बाब म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ‘टोटल हुबलाक’ या दोन मालिकांच्या चित्रीकरणास प्रत्यक्ष सुरुवात देखील झाली आहे.
जिल्ह्यातील विशेषतः पाटण, वाई, जावळी आणि महाबळेश्वर या तालुक्यांमधील काही ‘लोकेशन्स’ निर्माते आणि दिग्दर्शकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. पाटणमधील कोयना धरण परिसर, नेहरू गार्डन, घाटमाथा, वनकुसवडे, खळे, बनपुरी आदी. महाबळेश्वरमधील अनेक पॉईंट्स, पाचगणी शहरामधील टेबललँड, शाळा, तापोळ्यामधील बोटिंग पॉईंट्स त्याचसोबत जावळीचे खोरं हे सुप्रसिद्ध आहे. तर ऐतिहासिक वाई शहर, धोम डॅम, मेनवली, वरखेडवाडी ही ठिकाण देखील पसंतीस उतरली आहेत.
जुन्या काळातील निर्माते आणि कलाकार तर आहेतच, परंतु अलीकडील काही वर्षांमधील प्रकाश झा, विशाल भारद्वाज, आशुतोष गोवारीकर, अरबाज खान, प्रभुदेवा, महेश कोठारे, या दिग्दर्शकांचा साताऱ्याकडे विशेष ओढा आहे. सरगम, मदर इंडिया, ओमकारा, गंगाजल, राजनीति, स्वदेस, मंगल पांडे, बाजीराव मस्तानी, दबंग टू आणि थ्री, चेन्नई एक्सप्रेस, तारे जमीन पर अशा चित्रीत झालेल्या चित्रपटांची नाव न संपणारी आहेत. तर झी मराठी या वाहिनीवरील लागीर झालं जी, मिसेस मुख्यमंत्री, टोटल हुबलाक या मालिकांचे चित्रीकरण जिल्ह्यामध्ये झाले.
जिल्ह्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळवून देणारं हे क्षेत्र आहे. त्यात प्रामुख्याने शूटिंगसाठी लोकेशन्स शोधून देणे, स्थानिक स्तरावर हवी ती मदत मिळवून देण्यासाठी तरुणांनी स्वतःच्या पातळीवर तयार केलेली ‘एक खिडकी योजना’ ही निर्मात्यांना सोयीची वाटते. त्याचसोबत फोटोग्राफर, कॅमेरा सहाय्यक, सहाय्यक वेशभूषाकार, सहाय्यक केशभूषाकार, मेकअपमॅन/वुमॅन, प्रोडक्शन लेबर, साऊंड हेल्पर, लाईट हेल्पर, टेक्निकल सपोर्ट, स्थानिक डबिंग आर्टिस्ट, वॉटरबॉय या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार निर्मिती होते.
चित्रपट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या स्थानिक कलाकारांना मिळालेली संधी, कलाकरांना दळण-वळणासाठी आवश्यक असलेली वाहतूक व्यवस्था, सर्वांना जेवणासाठी केटरर्स या माध्यमांतूनही अनेक तरुणांच्या हाताला काम मिळते. ज्या गावामध्ये चित्रीकरण आहे तेथील स्थानिक विकासाला मदत, चित्रीकरणाच्या मोबदल्यात ग्रामपंचायतीला आर्थिक स्वरूपात मदत देणे यामुळे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. त्याचसोबत चित्रीकरणाच्या निमित्ताने जिल्ह्यात येणारे, चित्रीकरण पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये झालेली लक्षणील वाढ, अशा विविधांगी स्वरुपाचा फायदा जिल्ह्याला होतो.
या नियम व अटींसह परवानगी…
● चित्रीकरण प्रक्रियेमध्ये सामील असणाऱ्या प्रत्येकाने मास्क आणि पूर्ण शूटींग दरम्यान ग्लोज वापरणे बंधनकारक.
●चित्रीकरणाच्या संपुर्ण प्रक्रियेदरम्यान सामाजिक अंतर पाळणे सक्तीचे.
● हस्तांदोलन, मिठी मारणे अशा प्रकारची सर्व कृत्ये करणेस मनाई.
● दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी एक मीटर अंतर.
●65 वर्षावरील व्यक्तींना चित्रीकरण प्रक्रियेत समाविष्ट करणेस मनाई.
● चित्रीकरणादरम्यान लग्न समारंभ, पूजा, सण, उत्सव, सामूहिक नृत्ये अशा गोष्टी करण्यास मज्जाव.
●केश रचना व मेकअपसाठी डिस्पोजेबल वस्तू वापरणे.
●चित्रीकरणाचे ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हॅन्डवॉश, सॅनिटायझर, यांची प्रवेशद्वारावर व्यवस्था बंधनकारक.
●चित्रीकरणादरम्यान वापरात येणारे सर्व साहित्य उदा. – कॅमेरा, रिमोट, लाईट स्विच, स्क्रिप्ट पॅड, माईक, इलेक्ट्रिक सिस्टम इ. सर्व साहित्य वापरापूर्वी व वापरानंतर सॅनिटाईज करणे बंधनकारक.
चित्रीकरणामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराचे मोठे क्षेत्र सातारा जिल्ह्यात आहे. कलाकार, शुटींग लोकेशन्स, हॉटेल्स, केटरिंग, वाहतूक व्यवसाय आणि त्याच्याशी जोडलेले अनेक व्यवसाय इथे आहेत. सध्या कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे हे क्षेत्र मोडकळीस आलेले आहे. असे असताना या व्यवसायाला चालना देण्यासाठी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चित्रीकरणासाठी योग्य ती खबरदारी घेऊन परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातीला हा पहिला निर्णय ठरला आहे. या निर्णयामुळे चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचे कौतुक होत आहे. अनेक चित्रपट निर्माते आता सातारची वाट धरत असल्याने इथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. कलाक्षेत्रातील हा सातारा पॅटर्न चित्रपट क्षेत्रातील सर्वांसाठी आशादायक ठरत आहे –तेजपाल वाघ (पटकथाकार)
होय, तुम्ही सातारा जिल्ह्यात कुठेही शूटिंग करू शकता. सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्यासाठी परवानगी दिली आहे. केवळ आता चित्रपट-मालिका क्षेत्रातील सर्व निर्मिती संस्था आणि दिग्दर्शकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. नुकतंच आम्ही ‘टोटल हुबलाक’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू केले आहे. तुम्हाला ही तुमच्या चित्रपट, मालिका आणि वेबसीरिजचे चित्रीकरण सुरू करण्यास परवानगी मिळेल. लवकरात लवकर या आणि आता कास, ठोसेघर, बामणोलीच्या दऱ्याखोर्यांत तसेच माण खटावच्या माळरानांमध्ये पुन्हा एकदा आवाज घुमूद्यात : लाईट, कॅमेरा, ॲक्शन !!! -किरण माने (अभिनेते)