स्थैर्य, मुंबई, दि.७ : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात, केंद्र असो वा राज्य सरकारच्या निर्णयावर ते भाष्य करत असतात, अनेकदा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवरून रोहित पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, भाजपावर टीका केली आहे, स्वत:वरील टीकेलाही योग्य शब्दात उत्तर दिलं आहे. त्याचसोबत काही चांगले निर्णय झाले तर त्याचं कौतुकही केले आहे. त्याचाच प्रत्यत पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच जपानसोबत काही साम्यंजस्य करार केले आहेत, यात केंद्र सरकारने Specified Skilled Workers या क्षेत्रातील भागीदारीसाठी जपानसोबत केलेल्या कराराचं आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भारत व जपान यांच्यातील सहकार्य आणि भागीदारीसाठी संस्थात्मक यंत्रणा उभारली जाईल असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
त्याचसोबत आवश्यक कौशल्य प्राप्त केलेले आणि जपानी भाषा अवगत असणारे भारतीय मनुष्यबळ जपानमधील विविध १४ क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी पाठवणं सोपं होईल, या संधीचा फायदा देशातील सर्व राज्यातील युवांना समान पद्धतीने मिळावी अशी विनंतीही आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.