
स्थैर्य, फलटण, दि. 27 नोव्हेंबर :फलटणचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी माझ्यावर प्रभाग पाचची जबाबदारी सोपवली आहे, असे भाजप उमेदवार रोहित नागटिळे यांनी सांगितले. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी मतदारांशी संवाद साधताना केला.
प्रभागातील मूलभूत सोयीसुविधा विकसित करण्यासाठी ठोस नियोजन तयार केले असून येत्या काळात प्रत्येक नागरिकाला त्याचा प्रत्यक्ष फायदा मिळेल, असे नागटिळे यांनी स्पष्ट केले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व सार्वजनिक सुविधा या सर्व क्षेत्रांत सकारात्मक बदल करण्यासाठी प्राधान्याने काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
घरोघरी जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेण्यावर त्यांनी भर दिला असून प्रत्येक प्रश्नाची तातडीने दखल घेतली जात आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय वाढवण्याचे उपक्रमही राबवले जात असल्याचे ते म्हणाले.
“आपल्या प्रभागाला संविधानात्मक हक्कांनुसार कोणत्याही विकासातून मागे राहू देणार नाही,” असे ठाम आश्वासन देत रोहित नागटिळे यांनी मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. लोकाभिमुख कामे आणि विकासाची हमी देत त्यांचा प्रचार प्रभागात वेग घेत आहे.

