
दैनिक स्थैर्य । दि. 09 जुलै 2021 । फलटण । आळंदी – पंढरपूर – मोहोळ या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी धर्मपुरी येथे नीरा उजवा कालव्यामध्ये खोदाईचे काम सुरु असल्याने धरणक्षेत्रात पाणी उपलब्ध असूनही नीरा उजवा कालव्यात पाण्याचा खडखडाट झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान; या कालव्यातील पाण्याअभावी फलटण शहरासह तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याची संभाव्य अडचण लक्षात घेता फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या सूचनेनंतर निरा उजवा कालव्यात बुधवार, दि.7 जुलै 2021 रोजी 200 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जरी सुटला असला तरी शेतीपाण्याची समस्या मात्र शेतकर्यांना सतावत आहे.
फलटण शहर व तालुक्यातील सुमारे 35/40 गावांच्या पिण्याचे पाणी नीरा उजवा कालव्यावर अवलंबून आहे. कालवा बंद झाल्यानंतर याठिकाणच्या सर्व पाणी पुरवठा योजना कार्यान्वित राहण्यासाठी किमान 15 दिवसांत कालव्यात पुन्हा पाणी सोडणे आवश्यक असते. त्यानुसार दि. 21 जून 2021 रोजी कालवा बंद झाल्यानंतर दि. 5 ते 6 जुलै 2021 रोजी कालवा पुन्हा सुरु होणे अपेक्षीत असताना प्रशासनाकडून पाणी सोडण्यान न आल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत ‘स्थैर्य’ सह विविध प्रसारमाध्यमांमधून वृत्त प्रसारित झाल्यानंतर आमदार दीपक चव्हाण यांनी नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना तातडीने कालव्यात पाणी सोडण्याबाबत सूचना दिल्यानंतर बुधवार, दि.7 जुलै 2021 रोजी रात्री पाणी सोडण्यात आले.
तथापी, कालव्यात पूर्ण क्षमतेने म्हणजेच 1400 क्युसेस पाणी न सोडता केवळ 200 क्युसेस पाणी सोडण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचा तात्पुरत्या स्वरुपात जरी प्रश्न निकाली लागला असला तरी शेतीसाठी लागणार्या पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला आहे. शिवाय याबाबत ग्रामपंचायतींना कोणतीही पूर्व कल्पना देण्यात न आल्याने अनेक ग्रामपंचायतीना पुरेशा प्रमाणात पाणी साठा करता आला नसल्याने त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. तसेच कालवा 15 जुलै 2021 पर्यंत बंद राहणार असल्याचे सांगितले जात असल्याने विशेषत: तालुक्यातील ऊस पट्ट्यातील शेतकरी धास्तावला आहे.
पाण्याच्या खडखडाटाचे नेमके कारण काय?
दरम्यान, नीरा उजवा कालव्याच्या आवर्तनात खंड पडून पाण्याच्या खडखडाचे नेमके कारण जाणण्याचा प्रयत्न केला असता, आळंदी-पंढरपूर-मोहोळ या राष्ट्रीय महामार्गापैकी धर्मपुरी-लोणंद या भागाचे काम सुरु झाले असून सदर कामासाठी धर्मपुरी पाटबंधारे कार्यालयानजिक नीरा उजवा कालवा खोदून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु करण्यात आले आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी कालव्यावरील पुलाच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात आले असल्याने परिणामी कालव्यात जास्त पाणी सोडता येत नसल्याने नीरा उजवा कालवा प्रशासनाची मोठी कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.
कालवा खोदाई ठिकाणचे काम दि. 15 जुलै पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात सदर काम कधी पूर्ण होईल याबाबत अनिश्चितता असल्याने कालव्यात पूर्ण क्षमतेने पाणी कधी सोडले जाणार? शेतीच्या पाण्याचे पुढील नियोजन काय असणार? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. धरणात पाणी साठा असताना व फलटण विभागाचे उन्हाळी हंगामासाठी पाणी शिल्लक असताना राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी कालवा खोदल्याने तालुक्यातील नागरिकांवर एकप्रकारे कृत्रिम दुष्काळ भोगण्याची वेळ आली असून उन्हाळ हंगाम आवर्तन झाल्यानंतर कालवा खोदाईस परवानगी दिली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती; असा सूर तालुक्यातून उमटत आहे.