व्याजवाडी येथे जबरी चोरी, 53 हजार लुटले


स्थैर्य, वाई, दि.२५: व्याजवाडी (ता वाई) येथे पहाटेच्या सुमारास दोन अनोळखी इसम व त्यांच्या साथीदारांनी घरात घुसून सुरी व लाकडी दांडक्याचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण 53 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची प्रकार घडला. याबाबत अश्‍विनी राजेंद्र चव्हाण (रा. व्याजवाडी ता वाई)यांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आज पहाटे सव्वा तीनच्या सुमारास चार अनोळखी इसम घरात घुसले. यावेळी त्यातील एकाच्या हातात सूरी व दुसर्‍याच्या हातात लाकडी दांडके होते. त्यांनी धमकावून सोन्याचे डोरले, कानातील फुले, पायातील चांदीच्या पट्ट्या, गळ्यातील पोत जबरदस्तीने हिसकावून घेतले व त्याशिवाय रोख एक हजार रुपये असा एकूण 53 हजार पाचशे किमतीचा ऐवज चोरून नेला. त्याचप्रमाणे खारोटी वस्ती, बावधन येथे ऊस तोडणी कामगारांच्या चार झोपड्यातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे समजते, असे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सातारा येथून श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!