पोलिसांचा ड्रेस घालून कापूरहोळ येथे दरोडा


 

स्थैर्य, खंडाळा, दि. 6 : पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेनजीक असलेल्या खेड शिवापूर परिसरात कापूरहोळ गावाजवळ भरदिवसा दरोडेखोरांच्या टोळीने एका सराफी दुकानात घुसून, गोळीबार करत सोने लुटून नेल्याची खळबळजनक घटना गुरुवारी घडली. विशेष म्हणजे दरोडेखोरांनी पोलिसांचा ड्रेस घातला होता. यावेळी दरोडेखोरांनी दहशत माजवत सुमारे 30 ते 40 तोळे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर दरोडेखोर पांढर्‍या स्विफ्ट डिझायर कारमधून सातारा जिल्ह्याकडे पळून गेले असून त्याबाबत सातारा जिल्हा पोलीस दलाला माहिती देण्यात आलेली आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी, खेड शिवापूर परिसरात कापूरहोळ  गावाजवळ बालाजी ज्वेलर्स नावाचे सोने- चांदी विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट डिझायर  क्रमांक (एमएच 12 – एफएफ 2041)  कारमधून पाच दरोडेखोर बालाजी ज्वेलर्स या दुकानात घुसले. त्यामध्ये दोघांनी पोलिसांचा तर तिघांनी साधा पेहराव केला होता. त्यांनी दुकानात घुसून गोळीबार करत दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांच्या हाती सुमारे 30 ते 40 तोळे सोन्या-चांदीचे दागिने लागले. ते दागिने घेऊन ते पळून जाऊ लागले. यावेळी एकाने या दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हवेत गोळीबार करत दरोडेखोरांनी येथून पळ काढला. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. दरोडेखोर पसार झाल्यानंतर याबाबत पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोर चारचाकीतून पसार झाल्याने ठिकठिकाणी नाकाबंदी करून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनाही या  घटनेची माहिती देण्यात आली आहे. कापूरहोळसारख्या छोट्या गावात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून महामार्गावरील दुकानदारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

संबंधित कार आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधा

पांढर्‍या रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक (एमएच 12- एफएफ 2041) मधून दरोडेखोरांनी सातारा जिल्ह्याकडे पलायन केले आहे.  याबाबतची माहिती सातारा जिल्हा पोलीस दलाला देण्यात आली असून ही कार आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. या कारची पुढील काच फुटलेली आहे. या कारबाबत पोलीस पाटलांनी आपआपल्या गावातील ग्रामरक्षक दलांना माहिती देऊन चौकाचौकात नाकाबंदी करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!