दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२१ । सातारा । लिफ्ट मागण्यांच्या बहाण्याने दोन अज्ञात चोरट्यानी दुचाकीस्वारास लुटण्याची घटना सोमवारी रात्री गणेशवाडी(ता.सातारा) गावच्या हद्दीत घडली.चोरट्यानी रोख दहा हजार रुपये व दुचाकी यावेळी चोरून नेली.या घटनेची फिर्याद विठ्ठल दादासो निकम(वय.४७,रा.दूटाळवाडी,ता.पाटण) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी विठ्ठल निकम हे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी त्यांच्या दुचाकीवरून नागठाणे येथे आले होते.मित्राला भेटून रात्री ८.३० ते परत दूटाळवाडी येथे निघाले असता त्यांना २५ ते ३० वर्षाचे असणाऱ्या दोघांनी कोठे जाणार आहे? असे विचारले.यावेळी त्यांनी आपण दूटाळवाडी येथे जाणार असल्याचे सांगताच त्यानी आपली मावशी तेथे असून त्यांनाही दूटाळवाडी येथे जायचे असून लिफ्ट मागितली.
यावेळी या दोघांपैकी एकाने मी गाडी चालवतो असे सांगितल्याने विठ्ठल निकम मागे बसले. त्याच्या मागे दुसरा अज्ञात इसम बसला. गणेशवाडी गावच्या हद्दीत हे सर्वजण आल्यावर अज्ञातांनी दुचाकी खडी क्रॅशरच्या रस्त्याने आत नेऊन विठ्ठल निकम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यांच्या जवळील दहा हजार रुपये व दुचाकी असा सुमारे ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन अज्ञातांनी तेथून पलायन केले. मंगळवारी दुपारी विठ्ठल निकम यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात याची फिर्याद दाखल केली.घटनेचा पुढील तपास सपोनि डॉ.सागर वाघ करत आहेत.