दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । सातारा । सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेमध्ये एका वृद्धेला पोलीस असल्याचे भासवून तब्बल सव्वाचार लाखांचे दागिने हातचलाखी करून चोरून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवार (दि.26) रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिल्पा प्रमोद शहाणे (वय 72, रा. मंगळवार पेठ, सातारा) या मंगळवार, दि. 26 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मंगळवार तळ्यावर उपासनेसाठी निघाल्या होत्या. गोल मारुती मंदिरापासून पुढे चालत गेल्यानंतर तीन तरुण तेथे आले. आम्ही पोलीस आहोत, गस्त सुरू आहे. एवढे दागिने कशाला घातलेत काढा, हे दागिने आम्ही व्यवस्थित ठेवू’ असे त्यांनी सांगितले.
त्यामुळे शहाणे यांना हे खरोखरचे पोलीस असल्याचे वाटल्याने त्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, हातातील सोन्याच्या बांगड्या असे साडेआठ तोळ्यांचे 4 लाख 25 हजार रुपयांचे दागिने तोतया पोलिसांजवळ काढून दिले. संबंधित तिघा भामट्यांनी हातचलाखी करून दागिने पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून घेऊन गेले. या प्रकारानंतर शिल्पा शहाणे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.