दैनिक स्थैर्य । दि. ०३ मार्च २०२२ । मुंबई । दोन वर्षांपूर्वी जुलै – 2021 च्या अतिवृष्टीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाट रस्ता बंद असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ओणी – अणुस्कुरा घाट या मार्गावर वळविण्यात आल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती लवकरच करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले.
ओणी – अणुस्कुरा रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य राजन साळवी, भास्कर जाधव, योगेश कदम, नितेश राणे, संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.
मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, या मार्गावर वाढलेल्या वाहतुकीमुळे पावसाळ्यात खड्डे पडले होते. या रस्त्यावरील खड्डे देखभाल दुरुस्ती कामांतर्गत भरून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला आहे. याशिवाय काही ठिकाणी डांबरीकरणाचे काम प्रगतीवर आहे. उर्वरित कामांसाठी या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याचे मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.