स्थैर्य, खटाव, दि. ३० : खटावमध्ये परवा करोना बाधित महिला सापडली होती. त्यामुळे खटावमध्ये ‘यहा पे सब शांती… ही.. शांती है !’ असे वातावरण झाले आहे. बाधित महिलेच्या घरातील लोकांना क्वारन्टाईन करण्यात आले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत, दक्षता कमिटी, प्रशासन व पोलीस यंत्रणा खटावमध्ये अलर्ट झाली आहे. त्यामुळे गावातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. खटाव ग्रामपंचायत कार्यालयात दक्षता कमिटीची नुकतीच बैठक झाली.
यावेळी अशोक कुदळे, राहुल पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे व ग्रामसेवक चव्हाण उपस्थित होते. खटाव ग्रामपंचायतीने खटाव 5 दिवस पूर्णपणे लॉकडाउन केले आहे. गावात येणारे रस्ते बंद केले आहेत. कंटेन्मेंट झोन बॅरिकेटस् लावून सिलबंद केला आहे. खटावमध्ये औषध फवारणी केली जात आहे. दरम्यान, हाय रिस्क सहा जणांना पुसेगाव येथे क्वारन्टाइन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब घेतले जाणार असल्याचे समजते तर लो रिस्कमधील चार जण क्वारन्टाईन आहेत. दरम्यान, पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे तर आरोग्य विभाग दक्ष आहे. खटावमध्ये कोरोना संदर्भात अफवा पसरल्या आहेत. कोणीही त्या पसरवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.