
स्थैर्य, फलटण : हनुमंतवाडी ते पवारवाडी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात मातीचा थर साठला असतानाही संबंधित ठेकेदाराने ही माती झाडून काढून बाजूला न करता त्यावरच डांबराचे अस्तरीकरण करण्याचे काम चालू केल्याने या रस्त्याचे काम बंद पाडण्यात आलेले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हनुमंतवाडी ते पवारवाडी रस्त्याला मंजुरी मिळून वर्षे उलटल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले ते ही ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आणि त्यात या रस्त्यावर डांबर मिश्रित खडी टाकून संबंधित ठेकेदाराने सहा महिने उलटून गेले मात्र त्यावर डांबराचे अस्तरीकरण लवकर झाले नाही. मात्र अशा परिस्थितीत या डांबर मिश्रित खडीकरण रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात मातीचा थर साठला असतानाही संबंधित ठेकेदाराने ही माती झाडून काढून बाजूला न करता त्यावरच डांबराचे अस्तरीकरण करण्याचे काम चालू केले होते. मात्र निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे हनुमंतवाडीतील शिवसेनेचे रणजीत गायकवाड व प्रहार जनशक्ती तालुकाप्रमुख सत्यजित काळोखे यांच्या निदर्शनास आले असता त्या ठिकाणी जाऊन त्यांनी हे सुरू असलेले काम बंद केले.
या चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी ठेकेदाराने कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावलेत नाहीत तसेच यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या होत असलेल्या कामावरती सरकारी कर्मचारी कोणीही उपस्थित नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ऐन पावसाळ्यात नियमबाह्यपणे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याना हाताशी धरून बेकायदेशीरपणे होत असलेल्या कामावरती नागरिकांनीही आक्षेप घेत काम बंद करण्याची मागणी केली.
याबाबत बांधकाम विभागाचे अधिकारी तांबे यांना फोनवरून माहिती कळवली असता संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तांबे याठिकाणी उपस्थित झाले असता त्यांनी तक्रारदार पदाधिकारी यांची समजूत काढत काम चालू करतो व झालेली चूक सुधारतो असे सांगितले पण हि झालेली चूक सुधरेल का असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. सदर प्रकरणी चौकशी करून ठेकेदार व बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे रणजीत गायकवाड व प्रहार जनशक्ती तालुकाप्रमुख सत्यजित काळोखे यांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.