स्थैर्य, पुणे, दि.३१: पुण्यात थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चाकण येथील मुख्य चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर दोघांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यानं पोलीस कर्मचारी जागीच बेशुद्ध पडला. रॉड लागल्यानं कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कंटेनर मागे घेण्याच्या वादातून दोघांनी हा प्राणघातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे. रवींद्र नामदेव करवंदे (वय ३०) असे जखमी वाहतूक पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी दोन जणांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
चाकण वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी रवींद्र नामदेव करवंदे हे तळेगाव चाकण चौकात शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास कर्तव्य बजावत होते. तेव्हा, गर्दी असल्याने वाहतूक पोलिसांनी आरोपींना कंटेनर पाठीमागे घेण्यास सांगितला. ‘तुला अक्कल नाही का?’ असं म्हणत पोलीस आरोपींवर ओरडले. यावरून वाहतूक पोलीस करवंदे आणि आरोपीमध्ये शाब्दिक वाद झाला होता. पोलीस कर्मचाऱ्याने अक्कल काढल्यानं आरोपींना राग आला. राग मनात धरून दोन्ही आरोपींनी करवंदे हे कर्तव्य बजावत असताना अचानक दुचाकीवर येऊन त्यांच्या डोक्यात पाठीमागून लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर दोघांनी लगेच घटनास्थळावरून पोबारा केला.
अचानक झालेल्या हल्ल्यानं करवंदे हे काही क्षणातच भर चौकात कोसळले. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली होती. त्यात ते जागीच बेशुद्ध पडल्याचे पाहून नागरिकांनी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान आरोपींना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने चाकांच्या खराबवाडी येथून बेड्या ठोकल्या आहेत. रोहित बाबू साळवी (वय- 20 रा.) आ सम्राट अशोक बिल्डिंग समोर, कल्याण, ठाणे आणि हर्षदीप भारत कांबळे (वय- 22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. करवंदे यांनी कंटेनर मागे घेण्यावरून ‘तुला अक्कल नाही का?’ म्हटल्याच्या रागातून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची कबूली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांच्या पथकाने ही कारवाई केली.