स्थैर्य, मुंबई, दि.११: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. आता तिला 14 दिवस तुरुंगातच राहावे लागणार आहे. रियाव्यतिरिक्त शोविक चक्रवर्ती, अब्दुत बासिक, जैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. न्यायाधीश जेबी गुरव यांनी म्हटले की, हा एक गंभीर गुन्हा आहे आणि याचा तपास आवश्यत आहे.
यापूर्वीच मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने गुरुवारी आपला निर्णय राखून ठेवला होता. मॅजिस्ट्रेट कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रियाने मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आता रिया आणि तिच्या भावाला तुरुंगातच दिवस काढावे लागणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ने रियाला 8 सप्टेंबर रोजी अटक केली होती. दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) रियाविरोधात नवीन गुन्हा दाखल करू शकते.
गुरुवारी कोर्टात रियाच्या वकिलांचे 3 युक्तिवाद
1. चौकशीदरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रियावर आरोप मान्य करण्यासाठी दबाव आणला.
2. रियाच्या चौकशीदरम्यान कोणतीही महिला अधिकारी हजर नव्हती.
3. रियाच्या अटकेची गरज नव्हती. तिच्या स्वातंत्र्यावर बंदी घातली गेली होती, तिला याप्रकरणात अडकवले जात आहे.
रियाच्या जामीनाविरूद्ध एनसीबीचे 4 युक्तिवाद
1. रियाच्या चौकशीदरम्यान प्रोटोकॉलची पूर्ण काळजी घेण्यात आली होती.
2. रियाविरूद्ध इलेक्ट्रॉनिक्स पुरावे आहेत.
3. ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या बर्याच लोकांनी रियाशी संपर्क साधल्याची कबुली दिली आहे.
4. या प्रकरणात जप्त केलेल्या ड्रग्जचे प्रमाण कमी आहे, परंतु त्याची किंमत 1 लाख 85 हजार 200 रुपये आहे.
ईडी ड्रग्ज प्रकरणात पैशांच्या व्यवहाराची चौकशी करू शकते
सुशांत प्रकरणात, मनी लाँड्रिंगची चौकशी करणारी ईडी नवीन गुन्हा दाखल करू शकते. ईडीच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही नवीन खटला दाखल करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेत आहोत. यापूर्वी आम्ही सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला होता, जो सुशांतच्या बँख खात्यातून काढण्यात आलेल्या पैशांशी संबंधित होता. आता नवीन प्रकरण एनसीबीच्या तपासणीच्या निकालांवर आधारित असेल. कारण याप्रकरणी अनेकांना अटक झाली आहे. ईडी ड्रग्जची तस्करी आणि ड्रग्जच्या खरेदीतून कमावण्यात आलेल्या पैशांचा अँगल तपासेल.”