दैनिक स्थैर्य । दि. १२ डिसेंबर २०२२ । सातारा । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “चला जाणुया नदीला” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दि.१२ डिसेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत नदी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील कृष्णा, वेण्णा, येरळा व माणगंगा या नद्यांचा समावेश आहे. कृष्णा नदी संवाद यात्रा दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी क्षेत्र महाबळेश्वर येथून उत्साहात सुरू झाला.
या प्रसंगी सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक पवार, नदी संवाद यात्रेचे समन्वयक प्रदिप पाटणकर, उपविभागीय अभियंता तथा समन्वयक अधिकारी निलेश ठोंबरे, श्रीकांत वारुंजीकर, गट विकास अधिकारी अरुण मरबळे, क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायत सरपंच सुनिल बिरमने, समन्वयक रेणु येरळगावकर आदी उपस्थित होते.
पंचगंगा मंदीर व कृष्णामाई मंदीर येथे जलपुजन करुन नदी संवाद यात्रेची सुरुवात झाली. जि.प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत प्रभातफेरी आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. मरभळे श्री. पाटणकर, श्री. वारूंजीकर यांनी अभियानाचे उदिष्ट सांगून व मार्गदर्शन केले.