
दैनिक स्थैर्य । दि. ११ मे २०२२ । फलटण । महाबीज मार्फत फलटण तालुक्यात सोयाबीन ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये दि. १५ डिसेंबर ते दि. १५ जानेवारी पर्यंत उन्हाळी सोयाबीनची पेरणी करण्याबाबत शिफारस करण्यात आली होती, परंतू काही शेतकऱ्यांनी दि. १५ जानेवारी नंतर सुद्धा सोयाबीनची पेरणी केली. तसेच फुलकळीच्या अवस्थेवेळी वाढलेली उष्णता यामुळे फुलकळीचे व शेंगाचे प्रमाण कमी झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी दिली आहे.
फलटण तालुक्यात सुमारे ३७५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला असून वाढत्या उष्णतेमुळे सदर सोयाबीन पीक संकटात सापडले असल्याने त्याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली आहे. काही शेतकऱ्यांनी खरीप मध्ये ज्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती, त्याच क्षेत्रावर उन्हाळ्यामध्ये सोयाबीनची पेरणी केल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे खोडकीड व चक्री भुंग्याची जीवन साखळी ब्रेक झाली नाही व उन्हाळी सोयाबीन वरती खोडकीड व चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव दिसून आला व पिकाचे नुकसान झाले असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
खोडकीड व चक्री भुंगा नियंत्रणाकरिता कृषी विभागामार्फत प्रादुर्भावित क्षेत्रांमध्ये पाहणी करुन विषय विशेषज्ञांच्या मार्फत संबंधीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
बाजारातील वाढती मागणी आणि त्यामुळे चढ्या भावाने होणारी सोयाबीनची खरेदी लक्षात घेऊन फलटण तालुक्यात गेल्या २ वर्षांपासून उन्हाळी सोयाबीन पीक घेण्यास सुरुवात झाली आहे, मात्र वाढत्या तापमानाचा फटका बसल्याने यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. २/३ वर्षांपूर्वी सोयाबीन प्रती क्विंटल २५०० ते ३००० रुपये दराने विकले जात असे मात्र त्यानंतर सोयाबीनच्या दरात मोठी वाढ होऊन प्रति क्विंटल ५ ते ७ हजारापर्यंत वाढ झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी १२० दिवसांच्या आत येणारे हे पीक म्हणून गाळपास तुटून जाणाऱ्या ऊसाचे क्षेत्रात गव्हा ऐवजी सोयाबीनचा पेरा केला. गतवर्षी हा निर्णय फायदेशीर ठरल्याने यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली.
जानेवारी फेब्रुवारी महिन्यात तुटलेल्या ऊसाचे क्षेत्रात केलेले सोयाबीन उन्हाच्या तडाख्यातून वाचल्याने चांगले एकरी उत्पादन आणि उत्तम दर मिळाल्याने तो सोयाबीन उत्पादक शेतकरी हुशार ठरला, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून नंतर तुटलेल्या ऊसाच्या क्षेत्रात झालेला सोयाबीनचा पेरा मात्र संकटात सापडला आहे.