
स्थैर्य, फलटण, दि. ९ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ३ आणि ९ मधून युवा नेते ऋषीराज नाईक निंबाळकर यांच्या नावाची जनतेमधून जोरदार मागणी होत आहे. दोन्ही प्रभागांतून त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला जात असून, ऋषीराज नाईक निंबाळकर आगामी काळात कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऋषीराज नाईक निंबाळकर हे सध्या फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी खासदार गटाच्या विरोधात काम केले होते, हे सर्वश्रुत आहे. आता नगरपरिषद निवडणुकीत मात्र जनतेकडूनच त्यांना उमेदवारीसाठी गळ घातली जात आहे.
त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि जनसंपर्कामुळे त्यांना राजे गटाकडूनही ऑफर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोन्ही प्रमुख गटांकडून त्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
ऋषीराज नाईक निंबाळकर यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. ते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत राहणार की राजे गटाची ऑफर स्वीकारणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांचा निर्णय दोन्ही प्रभागांतील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतो.
प्रभाग ३ आणि ९ मधील नागरिक, विशेषतः तरुण वर्ग, ऋषीराज यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे चित्र आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागांतील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी काही दिवसांत ऋषीराज नाईक निंबाळकर आपला अंतिम निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या निर्णयावरच या दोन प्रभागांतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

