आसाममध्ये अडकलेले रायडर विकास शिंदे महाराष्ट्रात परतणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कोरेगाव, दि. 27 : बेटी बचाव बेटी पढाव’,‘पाणी वाचवा जीवन वाचवा’, ‘प्लॅस्टिक मुक्ती फायदा असा प्रेरणादायी संदेश देत भारत भ्रमणासाठी निघालेले कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली गावचे विकास शिंदे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील लॉकडाऊनमुळे आसाममध्ये अडकले आहेत. महाराष्ट्राच्या या पाहुण्यांचा तब्बल 62 दिवस यथोचित पाहुणचार करून आसाममधील मोरीगाव जिल्हा पोलीस प्रमुख स्वप्निल ढेका यांनी शिंदे यांच्या घरवापसीची तयारी केली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

विकास जगन्नाथ शिंदे यांना प्रेरणादायी संदेश देत भारत भ्रमण करण्याचे वेड आहे. आजपर्यंत सुमारे तीन लाख सदतीस हजार किलोमीटर प्रवास दुचाकीवर करून पाच वेळा त्यांनी भारत भ्रमण केले आहे. मंगळवार, दि.18 फेब्रुवारी रोजी सहाव्यांदा भारत भ्रमण करण्यासाठी वाठार किरोली येथून आपल्या दुचाकीवरून विकास शिंदे यांनी ‘एकला चलो रे..’ म्हणत पुन्हा प्रारंभ केला. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ चा संदेश देत प्रवास सुरू असतानाच आसाम राज्यातील धेमाजी जिल्ह्यात पोहोचले असताना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुढील प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला. या गंभीर परिस्थितीमध्ये पुढील प्रवास करणे किंवा परत आपल्या गावी जाणे अशक्य होते. काय करावे ? या प्रश्‍नाने शिंदे यांच्या डोक्यात काहूर माजले होते. डोक शांत ठेवून विचार केला व माहिती घेतली असता लातूर जिल्ह्याचे सुपूत्र नरसिंग पवार हे येथील जिल्हाधिकारी असल्याचे समजले. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कुरोली (माळीवाडी) गावचे सुपूत्र धनंजय घनवट हे येथील जिल्हा पोलीस प्रमुख असल्याचे त्यांना समजले. त्यांनी तात्काळ दोन्ही अधिकार्‍यांची भेट घेतली. दोन्ही अधिकार्‍यांनी आर्थिक मदत करून धनंजय घनवट यांनी मॉरीगावच्या जिल्हा पोलीस प्रमुख स्वप्नील ढेका यांना भेटण्यास सांगितले. स्वप्नील ढेका यांची विकास शिंदे यांनी भेट घेतली असता त्यांनी विचारपूस करून पोलीस विश्रामगृहात राहण्यासह खाण्यापिण्याची सोय केली. तब्बल 62 दिवस या ठिकाणी मुक्कामास असताना स्वप्नील ढेका, पोलीस उपअधीक्षक लुईथ तालुकरार व त्यांच्या सहकार्‍यांनी शिंदे यांना सर्वोतपरी सहकार्य केले. खासदार श्रीनिवास पाटील यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी धनंजय घनवट यांना फोन करून शिंदे यांना केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. विकास शिंदे यांना आर्थिक मदतही केली. भारत भ्रमणसाठी मार्गदर्शन करणारे गुरुवर्य दीपक भुजबळ व गावातील अनेक मित्रांनी आर्थिक मदत केली असल्याचे विकास शिंदे यांनी सांगितले. मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात मेडिकल चेकअप करून महाराष्ट्रात येण्यासाठी आसाममधून रवाना होणार असल्याचे विकास शिंदे यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!