दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑगस्ट २०२३ | फलटण |
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेतल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आगामी काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस माढा लोकसभेला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनाच तिकीट देणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फलटण येथे पार पडलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले होते. त्या पार्श्वभूमीवर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांची घेतलेली भेट महत्त्वाची मनाली जात आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील जाहीर कार्यक्रमात ‘काहीही झाले तरी या खासदारांना पाडायचे आहे’, असे मत व्यक्त केले होते व आगामी लोकसभेचा उमेदवार हा फलटणच्या वाड्यातीलच असेल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील विविध जाहीर कार्यक्रमात उपस्थिती दर्शविल्याने श्रीमंत संजीवराजेच माढ्याचे लोकसभेचे उमेदवार असतील, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ हा जर जिंकायचा असेल तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांचे आशिर्वाद महत्त्वाचे ठरणार आहेत, हे संपूर्ण मतदारसंघाला माहीत आहे. मोहिते – पाटील घराणे व फलटणचे नाईक-निंबाळकर घराणे यांचे संबंध पहिल्यापासून आहेत. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा धडाका लावला आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांचे व खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांचे राजकीय संबंध काही ठीक चालले नसल्याचे वारंवार बोलले जात आहे. त्यामुळे आज झालेली ही भेट श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पथ्यावर पडणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.