स्थैर्य, फलटण दि.20 : ‘‘महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ योजनेतून फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे चरित्र प्रसिद्ध करण्याचा रविंद्र बेडकिहाळ यांचा मानस कौतुकास्पद असून त्या माध्यमातून श्रीमंत मालोजीराजे यांचे कार्य सर्वदूर पोचेल’’, असा विश्वास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
येथील ‘लोकजागर’ वृत्तपत्राच्या कार्यालयास फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सदीच्छा भेट दिली. त्यावेळी शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळाच्यावतीने महाराष्ट्र राज्य व संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ‘लोकजागर’ चे संस्थापक, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचा श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेवराव माने, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, जगन्नाथ उर्फ भाऊ कापसे, तुषार नाईक निंबाळकर, किशोर देशपांडे, प्रसन्न रुद्रभटे उपस्थित होते.
‘‘फलटणच्या पत्रकारितेला विकासात्मक व समाजप्रबोधनात्मक पत्रकारितेचा वारसा आहे. रविंद्र बेडकिहाळ यांचे पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून त्याचीच दखल घेऊन शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. ही बाब फलटणकरांसाठी भूषणावह असून या माध्यमातून ग्रामीण भागातील नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहित करावे’’, अशी अपेक्षा श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी व्यक्त केली.
रविंद्र बेडकिहाळ यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे कार्य, उद्दिष्टे व विविध योजनांविषयी थोडक्यात माहिती देवून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुर्गसंवर्धनाच्या अनुषंगाने सूचना पाठवण्याच्या केलेल्या आवाहनानुसार फलटण तालुक्यातील किल्ले संतोषगडच्या संवर्धनासाठी प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्याला अनुसरुन बोलताना, ‘‘या किल्ल्याच्या संवर्धनाचा सर्वंकष आराखडा तयार करुन तो राज्यशासनामार्फत प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु’’, असे आश्वासन आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी दिले.
उपस्थितांचे स्वागत ‘लोकजागर’ चे संपादक रोहित वाकडे, भारद्वाज बेडकिहाळ यांनी केले.