
दैनिक स्थैर्य । 21 मार्च 2025। फलटण। एकदा राणीसाहेब विदेश दौर्यावर विमानाने प्रवास करत असताना विमान अपघात झाला. काही लोक दगावले. त्यावेळी राणीसाहेब ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाचन करत होत्या. अशा प्रसंगात त्या शांत राहिल्या. यातूनच त्यांच्यात भक्तीची शक्ती किती महान आहे हे दर्शवतो, त्यामुळेच श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब अध्यात्मिक ओढा असणारे व्यक्तिमत्व असे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे केले.
मालोजीराजे प्रतिष्ठान व मुधोजी महाविद्यालय फलटण यांनी आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनाच्या संयुक्त कार्यक्रमांमध्ये श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन प्रसंगी डॉ. सदानंद मोरे बोलत होते.
अध्यक्षस्थानी श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर होते. या कार्यक्रमाला लेखक प्राचार्य विश्वासराव देशमुख, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्नमेंट कौन्सिलचे सन्माननीय सदस्य डॉ. राजवैद्य, भोजराज निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, अरविंद मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब (प्राचार्य विश्वासराव देशमुख लिखित)चरित्र ग्रंथाचे प्रकाशन होत असताना मला मनस्वी आनंद होत आहे. ते म्हणाले, राणीसाहेब एकदा देहूला आल्या होत्या. तेव्हा दहा वर्षाच्या मुलाचे प्रवचन ऐकले व त्या मुलाची विचारपूस केली व त्यांनी पुढे त्याला फलटणला बोलवून घेतले. तो मीच सदानंद मोरे नऊ ते दहा वर्षाचा प्रवचनकार होतो. त्यावेळेपासून राणीसाहेबांनी मला जवळ करून राजाश्रय दिला. मला प्रोत्साहन दिले.
प्राचार्य देशमुख सरांनी हा चरित्र ग्रंथ लिहून मालोजीराजे यांच्या चरित्र ग्रंथाचा उत्तरार्धच पूर्ण केला आहे. हा ग्रंथ निश्चितच राजघराण्यातील या उभयंतांचा सामाजिक राजकीय दृष्टिकोन स्पष्ट करण्यास प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरेल. श्रीमंत मालोजीराजे व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यातील राजकीय संबंधही किती महत्त्वाचे होते याचे प्रतिपादन केले.
प्राचार्य विश्वासराव देशमुख म्हणाले, आपण राजघराण्यातील आतापर्यंत तीन चरित्र ग्रंथ लिहिलेले आहेत. हा ग्रंथ लिहिणे व पूर्णत्वाला जाणे माझ्या ददृष्टीने महत्त्वाचे होते. हे कार्य माझ्या हातून घडले. याबद्दल मी समाधानी आहे.
श्रीमंत संजीवराजे म्हणाले, महिलादिनाच्या दिवशी हा ग्रंथ प्रकाशित होतोय, हा दुग्धशर्करा योग आहे. आमच्या आजी या अतिशय आधुनिक विचाराच्या होत्या. त्यांच्या माध्यमातूनच स्पर्धा पद्धतीची संस्कृती नष्ट झाली. ग्रंथाच्या माध्यमातून हा आदर्श महिलांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केलेले आहे. महिला दिनादिवशी आपण महिलांचा आदर सत्कार करतो. तो वर्षातील प्रत्येक दिवशी करून त्यांना समान न्याय समान वागणूक दिली पाहिजे.
प्राचार्य डॉ. पी.एच कदम यांनी प्रास्ताविक केले. प्राध्यापिका गायत्री पवार यांनी सूत्रसंचालन केले. अध्यापिका उर्मिला भोसले यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील व विशेष निमंत्रित महिलावर्ग उपस्थित होता.