दैनिक स्थैर्य । दि. २७ फेब्रुवारी २०२२ । सातारा । महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग आणि तत्सम स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या आणि त्याकरता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये प्रवेश घेण्याकरता जे शुल्क लागते. त्यामध्ये सवलत देण्याचे नियोजन कैलासवासी श्रीमंत छत्रपती दादा महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून देण्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. या आगळावेगळा उपक्रमाची माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की, पश्चिम महाराष्ट्रामध्ये राज्य किंवा केंद्र स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आपले नशीब प्रशासकीय नोकरीसाठी आजमावत असतात त्याकरिता योग्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि त्याकरता लागणारे शुल्क अदा करणे ही मोठी कसोटीची गोष्ट असते. याकरता हिंदवी फ्युचर स्किल्स च्या माध्यमातून ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्गदर्शन शुल्कामध्ये 50 टक्के सवलत देण्याचे नियोजन आहे. याचे नियोजन खासदार उदयनराजे भोसले यांनी सीएसआर फंडातून करण्याचे ठरविले आहे. जे विद्यार्थी या केंद्रामध्ये मार्गदर्शन घेऊ इच्छितात आणि आर्थिक दृष्ट्या निम्नस्तर गटातील आहेत त्यांच्या साठी विहीत निकषात ही शिष्यवृत्ती लागू होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण असूनही या परीक्षांच्या आवश्यक अशा मार्गदर्शन टिप्स आणि त्याचे शुल्क भरू न शकल्याने होतकरू युवावर्ग प्रशासकीय नोकरीच्या प्रवाहापासून दूर जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्राप्त होणाऱ्या सीएसआर फंडाचा उपयोग अशा विद्यार्थ्यांना शिक्षण मार्गदर्शन शुल्क देण्याकरिता एक आराखडा बनवण्यात आला असून या शिष्यवृत्ती ला कैलासवासी श्रीमंत छत्रपती दादा महाराज स्कॉलरशिप असे नाव देण्यात आले आहे . या योजनेमुळे सीएसआर फंडाचा चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शुल्कामध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे तसेच या योजनेअंतर्गत तज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षांचे तयारी कशी करावी याच्या मार्गदर्शन टिप्स दिल्या जाणार आहेत असा तिहेरी फायदा विद्यार्थ्यांचा होणार आहे शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट चे सदस्य अमित कुलकर्णी यांनी हे नवीन हिंदवी फ्युचर स्किल्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे या या मार्गदर्शन केंद्राची संलग्नित दादा महाराज शिष्यवृत्तीचा गरजू विद्यार्थ्यांनी जरूर लाभ घ्यावा असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.