स्थैर्य, फलटण : फलटण क्लॉथ मर्चंट असोसिएशनच्यावतीने आज जिल्हाधिकारी यांचे नावे असलेले निवेदन तहसीलदार यांना देऊन दि. २७ ते ३१ जुलै दरम्यान लावण्यात आलेला लॉक डाऊन आदेश त्वरित मागे घेऊन दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे, सततच्या लॉक डाऊन मुळे सर्वच व्यापारी/व्यावसाईकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
दि. २२ मार्च पासून शासन/प्रशासनाने घालुन दिलेले नियम/निकष, लॉक डाऊन याचे आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी तंतोतंत पालन केले असल्याचे निवेदनात नमूद करीत यापुढेही सर्व नियम, निकष सांभाळून व्यापार, व्यवहार सुरु ठेवण्यास आम्ही निश्चित बांधील आहोत, तथापी दि. २६ जुलै रोजी नव्याने लावण्यात आलेल्या लॉक डाऊन आदेशाने सर्वच व्यापऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांचे बंदमुळे अक्षरशः कंबरडे मोडले असल्याच्या भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
गेल्या ३/४ महिन्यातील लॉक डाऊन मुळे झालेले व्यावसायिक नुकसान भरुन न येणारे आहे, त्यातच व्यापारी देणी, दुकान भाडे, लाईट बिल, स्थानिक कर, अन्य विविध कर याशिवाय प्रपंचाचा खर्च या सर्व बाबी कशातून देणार असा प्रश्न सर्वच व्यापाऱ्यांसमोर आहे, यापैकी कोणताही खर्च चुकणारा नाही, दुकाने बंद असल्याने एक रुपयांचे उत्पन्न नाही, अशा परिस्थितीत काय मार्ग काढावा या विवंचनेत असताना पुन्हा लॉक डाऊनची घोषणा झाल्याने सर्व व्यापारी हवाल दिल झाले आहेत, तरी सदर लॉक डाऊन त्वरित मागे घेऊन सहकार्य करण्याची विनंती निवेदनाद्वारे तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.
व्यापारी व दुकानातील नोकरदार यांची मोठी कुचंबना होत असल्याने सदर निवेदनाद्वारे वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद करीत संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री व प्रांताधिकारी यांना पाठविण्यात आली आहे. दि फलटण क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष विकास शहा, उपाध्यक्ष प्रितम गांधी, मिलिद गानबोटे, श्रीकांत करवा, विपुल गांधी, राजेश दोशी, विकास माने, अब्दुल कादर आतार, सारंग नाईक, मंदार करवा वगैरेंनी तहसीलदार यांची भेट घेऊन वरील निवेदन त्यांना देऊन परवानगीसाठी शिफारस करण्याची विनंती त्यांना केली असल्याचे द्वारकादास श्यामकुमार फार्मचे दत्तात्रय (बुवा) मोहिते यांनी सांगितले.