दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२२ । पुणे । महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नोंदणी व मुद्रांक विषयक कामकाजाचा आढावा घेतला. नोंदणी विषयक सुविधांमध्ये अद्ययावतीकरण करण्यासंदर्भात गतीने कार्यवाही करा, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, सह नोंदणी महानिरीक्षक ज्ञानेश्वर खिलारी, नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड, सुहास मापारी आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. हर्डीकर यांनी विभागामार्फत सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. रजिस्ट्रेशन ॲक्ट १९०८ मधील सुधारणा करण्याबाबतच्या प्रस्ताव ल, मुंबई मुद्रांक अधिनियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव, नोंदणी विभागांतर्गत माहिती व तंत्रज्ञानामार्फत सुरू असलेले नवीन उपक्रमाची सदारीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.
महसूल विभागातील इतर सर्व कार्यालये, तहसिल कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालय यांचे आधुनिकीकरण व संगणकीकरण करण्यासाठीच्या उपाययोजना याबाबतही आढावा घेण्यात आला. यावेळी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातील सर्व कार्यासन अधिकारी उपस्थित होते.