दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | सातारा जिल्ह्यात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
या महाविद्यालयासाठी ४९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच तांत्रिक प्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणून केंद्रीय समिती लवकरच या प्रकल्पाची पाहणी करणार आहे. पुढील वर्षात लवकरच वैद्यकीय महाविद्यालयाची प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती सहकार मंत्री श्री. पाटील यांनी दिली.
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेत हे महाविद्यालय उभे राहणार आहे. यासाठीची कार्यवाही तातडीने करावी. हे महाविद्यालयात सुरू करण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.
या महाविद्यालयात 100 एमबीबीएस विद्यार्थ्यांची पहिली तुकडी शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी लेक्चर रूम, स्किल लॅब आणि सेंट्रल रिसर्च लॅबसह चार प्रयोगशाळा, डिजिटल लायब्ररीसह केंद्रीय ग्रंथालय, मुलां-मुलींसाठी वसतीगृह सुविधा, खेळाचे मैदान व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याशिवाय राज्य सरकारने केंद्रीय प्रयोगशाळेच्या सर्व सुविधा, पॅथॉलॉजी, सूक्ष्म जीवशास्त्रासाठी क्लिनिकल बायोकेमिस्ट्री लॅबसह हॉस्पिटल कॅम्पसमध्ये अतिरिक्त लेक्चर थिएटरसह प्रयोगशाळेसाठी 13 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
ग्रंथालय, पुस्तके, जर्नल्स, आवश्यक फर्निचर, संगणक आणि इतर अध्यापन सुविधांसाठी प्रथम वर्षांच्या प्रयोगशाळेच्या उपकरणे खरेदीसाठी सहा कोटी 50 लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. एनएमसीच्या निकषांनुसार कौशल्य प्रयोगशाळेच्या विकासासाठी एक कोटी 40 लाख रु. निधी मंजूर आहे. राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षक, पॅरामेडिकल, तांत्रिक आणि गैर-तांत्रिक कर्मचारी, वरिष्ठ आणि कनिष्ठ आवश्यक पदे मंजूर केली आहेत.अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार यांनी सादरीकरणात दिली. या इमारत संदर्भातील आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी कार्यकारी अभियंता संजय दराडे, सल्लागार कंपनीचे अनिरुद्ध दत्त, सोनल पटेल उपस्थित होते.