दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । सातारा । ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याचे विज बिल कमी येण्यासाठी ज्या गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत कामे घ्यावयाची आहेत त्या गावांमधील जागांची उपलब्धता पाहून जास्तीत जास्त योजना सौर ऊर्जेवर घ्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) किरण सायमोते, प्रकल्प व्यवस्थापक तथा लेखाधिकारी सुनील जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, अतिवृष्टी बाधीत वाई, पाटण, जावळी ,महाबळेश्वर व सातारा तालुक्यातील डोंगरी भाग यामध्ये झऱ्यावर आधारित ज्या नळपाणीपुरवठा योजना आहेत, त्यामधील ज्या योजना अतिवृष्टी मुळे वाहून गेल्या त्या योजनांचे काम असे करा की भविष्यात या योजना अतिवृष्टीमुळे बाधित होणार नाही. उद्भव बळकटीकरण उपाय योजनेमध्ये छोटे बंधारे घ्यावेत. उद्भव शाश्वतत्तेची खात्री करूनच योजना तयार करण्यात यावी. 100% कनेक्शन साठी गावामध्ये 55 लिटर प्रति दिवशी प्रति माणशी याप्रमाणे तसेच बारा महिने गुणवत्तापूर्वक पाणी उपलब्ध होत आहे याची खात्री करूनच गटविकास अधिकारी व उपअभियंता यांनी अहवाल द्यावा.
15 लक्ष पेक्षा कमी किमतीची कामे ग्रामपंचायत मार्फत केली जात आहेत. त्या कामांची गुणवत्ता तसेच जलजीवन मिशनच्या निकषानुसार पाणी उपलब्ध होईल याची खात्री करण्यात यावी. आराखडा अथवा पाणीपुरवठा योजना करताना ग्रामसभेचा सहभाग घेण्यात यावा. सर्वेक्षणासाठी राज्य शासनाकडून ज्या एजन्सीची नेमणूक झाली आहे त्यांनी कामाची गती वाढवावी तसेच सर्वेक्षणासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या टीम नियुक्त कराव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
सातारा जिल्ह्यात एकूण 5,77,043 इतकी नळ कनेक्शन देणे अपेक्षित असून त्यापैकी 31 मार्च 2021 पर्यंत 4,59,551 नळ कनेक्शन देण्यात आली आहेत. सन 2021-22 साठीचे नळकनेक्शन चे जे उद्दिष्ट घेण्यात आले आहे. ते उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी बैठकीत सांगितले.