दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२३ । मुंबई । रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल समुद्रामध्ये कोकण एलएनजीमार्फत ब्रेक वॉटरच्या कामाकरीता संरक्षण भिंत उभारली जात आहे. त्यासाठी वरवेली येथील गौण खनिज उत्खनन केले जाते आहे.
यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने याबाबत चौकशी करुन कार्यवाही करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभेत वरवेली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथील गावातील घरांना व विहिरींच्या बांधकामाला तडे गेल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केला होता.
महसूल मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, उत्खननासाठी मोठ्या प्रमाणात सुरुंग लावण्यात येतो. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांच्या घरांच्या बांधकामांना व इतर बांधकामांना मोठ्या प्रमाणात तडे जात आहेत.
तसेच शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल यांचे सुरुंगामुळे पाणी कमी होणे,आंबा, काजू बागायतदार यांचे धुळीमुळे नुकसान, ध्वनी प्रदूषण याबाबत तक्रारी आहेत. या सर्व बाबींची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात येतील.
तसेच अवैध उत्खनन होत आहे का याबाबतही चौकशी करुन कार्यवाही करण्यात येईल, असे महसूल मंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले. या प्रश्नावेळी विधानसभा सदस्य आशिष शेलार यांनी सहभाग घेतला होता.