दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑगस्ट २०२३ । मुंबई । गोरेगाव येथील आरे वसाहतीच्या विकासासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात येणार आहे. या वसाहतीतील मूलभूत सोयी सुविधाबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य रवींद्र वायकर यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान आरे वसाहतीतील रस्ते देखभाल, पथदिवे, वैद्यकीय सुविधा याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, आरे वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. येथील अतिक्रमणाबाबत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मागील काही दिवसात आरेमध्ये तीनशेपेक्षा जास्त पथदिवे बसविण्यात आले आहेत. आरेमधील रहिवाशांना पाणी, रस्ते, आरोग्य, वीज अशा मूलभूत सोयीसुविधा तत्काळ पुरवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. आरेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने गठित केलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत योगेश सागर यांनी सहभाग घेतला.