
दैनिक स्थैर्य । दि. २५ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा तालुक्यातील खिंडवाडीनजीक असणाऱ्या दगड खाणीत चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील अमोल डोंगरे या २८ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला होता. याचा तपास सुरु असताना त्याचा खून झाला असल्याचे समोर आले असून सातारा शहर पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण संशयिताचा शोध घेत आहेत. दरम्यान, अमोल डोंगरे हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, खिंडवाडी येथील दगडाच्या खाणीत चार दिवसांपूर्वी एका युवकाचा मृतदेह आढळला. याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. युवकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याच्या हातावर राणी असे गोंदलेले होते. यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण याचा शोध घेत असताना मृताची ओळख पटली असून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला असून लवकरच त्याची माहिती देण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.