दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा कोषागार कार्यालयातून निवृत्ती वेतन घेणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या तसेच इतर राज्यांचे व केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन धारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरीता मिळालेल्या उत्पन्नातून आयकर सूट मिळण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचा तपशील लेखी अर्जासह दि. 15 जानेवारी 2022 पर्यंत कोषागार कार्यालय सातारा येथे सादर करावा असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे यांनी केले.
निवृत्ती वेतन धारकांनी तपशीलात बँकेचे नाव, शाखा, पॅनकार्ड नंबर नमूद करणे आवश्यक आहे. तसेच पॅनकार्डची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे. OLD TAX REGIME व NEW TAX REGIME यापैकी योग्य असणारा पर्याय निवडावा. आवश्यक असल्यास आपल्या नजीकच्या सनदी लेखापालची मदत घ्यावी. जे निवृत्ती वेतन धारक TAX REGIME ची निवड वेळेत कळवणार नाहीत त्यांची पूर्वीप्रमाणे OLD TAX REGIME मध्ये वजावट करण्यात येईल.
जे निवृत्तीवेतनधारक गुंतवणुकीचा तपशील दि. 15 जानेवारी 2022 पर्यंत सादर करणार नाही व अशा निवृत्ती वेतन धारकांची माहे जानेवारी 2022 व फेब्रुवारी 2022 च्या निवृत्तीवेतनातून आयकर पात्र रक्कम कपात करण्यात येईल. 60 वर्षावरील निवृत्ती वेतन धारकांचे सर्व फरकासह वार्षिक उत्पन्न रुपये पाच लाख च्या आत आहे अशा वार्षिक उत्पन्न आयकर पात्र नसणाऱ्या निवृत्ती वेतन धारकांनी गुंतवणुक तपशील सादर करण्याची आवश्यकता नाही.
तरी आयकर पात्र निवृत्ती वेतन धारकांनी विहित वेळेत गुंतवणुक तपशील सादर करुन सहकार्य करावे असे आवाहन कोषागार अधिकारी धनाजी शिंदे यांनी केले आहे.