
कोळकी येथील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र शेडगे यांचे वृद्धापकाळाने निधन. उद्या सकाळी ९ वाजता फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार.
स्थैर्य, फलटण, दि. २२ डिसेंबर : कोळकी (ता. फलटण) येथील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र शेडगे (वय ८४) यांचे आज (सोमवारी) रात्री ९ वाजता उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कोळकी आणि फलटणच्या शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
रामचंद्र शेडगे हे केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे, तर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही परिचित होते. सेवानिवृत्त संघटनेच्या कार्याबरोबरच विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांत ते नेहमी अग्रेसर असत. त्यांच्या मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार आणि विद्यार्थी वर्ग होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. कोळकी ग्रामपंचायतचे माजी सदस्य तथा कॉन्ट्रॅक्टर सतीश शेडगे आणि प्राथमिक शिक्षक बँकेच्या फलटण शाखेचे व्यवस्थापक (मॅनेजर) नितीन शेडगे यांचे ते वडील होत.
त्यांची अंत्ययात्रा उद्या (मंगळवार, दि. २३ डिसेंबर) सकाळी ८:०० वाजता त्यांच्या कोळकी येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यानंतर सकाळी ९:०० वाजता फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

