
स्थैर्य, फलटण, दि. ०७ : फलटण शहरासह तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. फलटण मधील गोर गरीब रुग्णांना कोरोना उपचारासाठी बेड्स मिळत नाहीत. तरी फलटण मध्ये प्रशासनाने पुन्हा कोरोना केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी आता सोशल मीडियावर जोर धरू लागलेली आहे.
सध्या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना सातारा येथील जम्बो कोव्हिड केअर सेंटर मध्ये पाठवले जात आहे. परंतु आता तिथेही रुग्ण संख्या वाढत असल्याने पुन्हा फलटण येथील सर्व कोरोना केअर सेंटर सुरू करावेत. या सोबतच फलटण मध्ये रेमडीसीव्हर या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. फलटण मधील कोरोनाबाधित रुग्णांना रेमडीसीव्हर हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून रेमडीसीव्हर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवावे, अशी हि मागणी जोर धरू लागली आहे.