दैनिक स्थैर्य । दि. ९ मे २०२२ । फलटण । कर्नाटकातील ‘क्लेरेन्स हायस्कूल’ या कॉन्व्हेंट शाळेत मुलांना बायबल शिकणे बंधनकारक करण्यात आले आहे. भारतात व्यापारासाठी आलेल्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळापासून ते आतापर्यंत ख्रिस्ती मिशनऱ्यांनी स्थापन केलेल्या कॉन्व्हेंट शाळांचे लक्ष्य विद्यार्थ्यांचे धर्मांतर करणे हाच उद्देश दिसून येतो. सद्यःस्थितीत देशात प्रतिवर्षी १० लाख हिंदूंचे धर्मांतर होते, ही खेदाची गोष्ट आहे. हिंदूंना त्यांच्या धार्मिक अधिकारांपासून वंचित करायचे आणि दुसरीकडे कॉन्व्हेंट शिक्षण संस्थांमध्ये हिंदु मुलांना बायबल बंधनकारक करायचे, हा दुटप्पीपणा असून हिंदु विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणावा, तसेच घटनेतील कलम २९ आणि ३० यामध्ये सुधारणा करावी अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फलटणमध्ये करण्यात आली आहे.
फलटण येथील निवासी नायब तहसीलदार डाॅ. डी. एस. बोबडे यांच्याकडे या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी विजय पालकर, राजेंद्र कुंभार तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उदय ओझर्डे, सौ. सिधू कुंभार, सौ. शैलेजा देशपांडे उपस्थित होते.