ढोल्या गणपती मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याला प्रारंभ

डॉ.अच्युत गोडबोले; सातारच्या लाडक्या ग्रामदैवतासाठी सर्वांनी सहकार्य करावे


सातारा – येथील श्री ढोल्या गणपती मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याचा प्रारंभ प्रसंगी मान्यवर (छाया – अतुल देशपांडे सातारा)
स्थैर्य, 20 मार्च, सातारा : येथील माची पेठ परिसरात असणार्‍या आणि समस्त सातारकरांचे लाडके आद्य ग्रामदैवत असणार्‍या श्री ढोल्या गणपती मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सातारचे माजी नगराध्यक्ष,श्री समर्थं सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष ,ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉ.अच्युत गोडबोले, नगर विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक अविनाश कदम तसेच सातारा येथील बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट व कैलास स्मशानभूमीचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र चोरगे यांचे सह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

जीर्णोद्धार कार्याचा प्रारंभ करण्यात आलेल्या या आद्य ग्रामदैवत असलेल्या ढोल्या गणेश मंदिराचे नुतनीकरण कार्यासाठी सातारच्या राजघराण्यातील सर्व माननीय महोदयांनी तसेच लाडके खासदार श्री. छ.उदयनराजे भोसले, राज्याचे बांधकाम मंत्री नामदार श्री.छ. शिवेंद्रराजे भोसले, श्रीमंत सौ. वृषालीराजे भोसले, श्रीमंत सत्वशीलाराजे अक्षोभसिंह सिंग आणि अदालत वाडा येथील राजे भोसले घराण्यातील मान्यवर व्यक्तींनी हे कार्य आपणा सर्वांचे असून या कार्यासाठी कोणत्याही स्वरूपात लागणारी मदत करण्यासाठी सातत्याने राजघराणे अग्रभागी राहील तसेच या कार्यासाठी समस्त सातारकरांनी मोठ्या उदार हस्ते तन- मन-धन अर्पून हे कार्य लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी डॉ.अच्युत गोडबोले यांनी केले .
यावेळी राजेंद्र चोरगे यांनी, हा प्रकल्प खरोखरच सातारच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असून या कार्यात सर्वच गणेश भक्त निश्चित मोठ्या स्वरूपात मदत करून लवकरात लवकर पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला .

ज्येष्ठ नगरसेवक अविनाश कदम यांनी या मंदिराच्या नूतनीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य वैयक्तिक रूपात तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून आपण अवश्य करू अशी ग्वाही दिली. याप्रसंगी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त
राजन सबनीस यांनी सर्व मान्यवरांचे तसेच देणगीदार, उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सर्वांचे आभार मानले. यावेळी सातारा नगरपरिषदेचे मान्यवर नगरसेवक धनंजय उर्फ भाऊ जांभळे, सौ. सिद्धी पवार, राजू गोरे, सौ.आशा पंडित, प्रशांत आहेरराव,सागर पावसे,यांचेसह या मंदिर प्रकल्पाचे आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, इंजिनिअर व बिल्डर अविनाश कुलकर्णी, विश्वस्त विजय पवार, गजानन गोडबोले, विक्रांत मेहेंदळे,अनिरुद्ध जोशी,नारायणदास राठी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी गणेश मंदिरात महाआरती करून ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिर ट्रस्टचे विश्वस्त गजानन गोडबोले यांच्या हस्ते सपत्निक पुण्याहवाचन हा धार्मिक विधी संपन्न झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या जीर्णोद्धार कार्याचा प्रारंभ करण्यात आला.या जिर्णोद्धारासाठीदेणगी संपर्क- गोडबोले सुगंधी, चे. 8484891671 तांदुळ आळी, सातारा. येथे करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!