स्थैर्य, सातारा दि. 18 : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने दि. 31 मे 2020 पर्यत चौथा लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व आरोग्य, पोलिस, सरकारी अधिकारी, आरोग्यसेवा कर्मचारी, लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेले नागरिक, पर्यटक आणि अलगीकरण कक्षातील व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा तसेच बस डेपो, रेल्वेस्थानक व विमानतळावरील कॅन्टीन वगळून जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट धारकांनी त्यांचे रेस्टॉरंट मधील किचनमध्ये मागणीनुसार ताजे खाद्यपदार्थ तयार करुन ते सकाळी 8 ते सांय 6 या निर्धारीत वेळेत ग्राहकांच्या मागणीनुसार फक्त होम डिलीव्हरी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुढील अटी व शर्तीस अधिन राहून परवानगी देण्यात दिली आहे.
कोणत्याही परिस्थितीत रेस्टॉरंटच्या किचन मधील कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त रेस्टॉरंट मध्ये इतर कोणत्याही त्रयस्थ नागरिकांस प्रवेश देवू नये. रेस्टॉरंट किचनमधील कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टंन्सिंग पाळणे व मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. रेस्टॉरंटमधून मागणीप्रमाणे पार्सल सेवा पुरविण्याची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत राहील. रेस्टॉरंट मधील किचन व्यतिरिक्त इतर कोणताही विभाग व खोली उघडण्यास अथवा वापरण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे. रेस्टॉरंट मधील किचनमध्ये रोजच्यारोज स्वच्छता राखवी आणि वेळोवेळी किचन मधील जागा व इतर साहित्य् यांचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. पार्सलसेवा देताना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त चार्जेस स्विकारता येणार नाहीत. डिलीव्हरी देणाऱ्या व्यक्तीकडे संबंधित रेस्टॉरंटचा ड्रेसकोड व ओळखपत्र असणे बंधनकारक राहील. रेस्टॉरंट मालकाने शक्यतो होम डिलीव्हरीच्या ऑडर्स ह्या ऑनलाईन पध्दतीने स्विकारुन संबंधित ग्राहकास ऑनलाईन पध्दतीने माहिती पुरवावी. पार्सलसेवा पुरविणाऱ्या व्यक्तीने मास्क् किंवा फेस शिल्ड वापरणे बंधनकारक असून संबंधीत व्यक्तीने ग्राहकामध्ये कमीतकमी सहा फूट अंतर ठेवून सेवा पुरविण्याची आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय जागा व सर्व खाजगी जागा (जेथे सामान्य माणसांचा वावर आहे) अशा कोणत्याही ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात येत आहे आणि कोणतीही व्यक्ती थुंकल्यास त्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. हा दंड ती जागा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असेल त्यांच्याकडे जमा करावा किंवा त्या स्थानिक संस्थेने सक्तीने वसूल करावा.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रेस्टॉरंट व्यावसायिकाविरुध्द नियमानुसार कडक कारवाई करण्यात येऊन संबंधितांचा परवाना तात्काळ कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.