अनलॉक-5 : रेस्टॉरंट, बार उद्यापासून सुरू; मार्गदर्शक प्रणाली जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.४: अनलॉक-५ अंतर्गत सोमवारपासून (दि.५ ) रेस्टॉरंट, बार, कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांनी शक्यतो जागेचे पूर्व आरक्षण करावे तसेच मास्क लावलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रांतील रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत शनिवारी आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली. मिशन बिगिन अगेनअंतर्गत येत्या सोमवार, दि. ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट‌्स, रेस्टॉरंट‌्स आणि बार सुरू करण्यास संमती देण्यात आली आहे. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर – सिंह यांनी आदरातिथ्य क्षेत्रातील विविध रेस्टॉरंट‌्स आणि हॉटेल संघटनांना पत्राद्वारे एसओपीची माहिती दिली आहे. आस्थापना चालकांनी सोशल डिस्टन्सिंग आदींबाबत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे. अशा विविध मुद्द्यांसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचा समावेश एसओपीमध्ये करण्यात आला आहे.

करमणूक कार्यक्रमांना मनाई


करमणुकीच्या लाइव्ह कार्यक्रमास मनाई असेल. तसेच बिलियर्ड‌्स, डार्ट‌्स, व्हिडिओ गेम्स आदी गेम क्षेत्रास मनाई असेल. इनडोअर आणि आऊटडोअर कार्ड रूमला मनाई असेल. सर्व आस्थापनांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची नियमित कोविड चाचणी करणे अत्यावश्यक आहे.

सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे


१. कोरोनाच्या लक्षणांसंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा. सेवा देताना किंवा प्रतीक्षा करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.

२. ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा. खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे.

३. ग्राहकांसाठी हँड सॅनिटायझर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी ते उपलब्ध करण्यात यावेत.

४. डिजिटल माध्यमाद्वारे बिल देण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख चलनव्यवहार असल्यास चलनाची हाताळणी काळजीपूर्वक करावी.

५. रेस्टरूम आणि हात धुण्याच्या जागांची (वॉशरूम) वेळोवेळी स्वच्छता (सॅनिटाइज) करण्यात यावी. काउंटरवर कॅशियर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लेक्सिग्लास स्क्रीन असावे. शक्य असल्यास प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावेत.

६. एसीचा वापर टाळावा. एसी वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असाव्या.

७. क्यूआर कोडसारख्या माध्यमातून संपर्करहित मेन्यूकार्ड उपलब्ध करावे. कापडाच्या नॅपकिनऐवजी चांगल्या दर्जाच्या विघटनशील पेपर नॅपकिनचा वापर करावा.

८. दोन टेबलांमध्ये किमान १ मीटर अंतर राहील याप्रमाणे रेस्टॉरंट, बार यांच्या रचनेमध्ये आवश्यक बदल करण्यात यावा.

९. मेन्यूमध्ये शक्यतो शिजवलेल्या पदार्थांचा समावेश असावा. शक्य असल्यास सलॅडसारखे कच्चे पदार्थ, थंड पदार्थ टाळावेत.

१०. प्रत्येक ग्राहकाच्या वापरानंतर त्या जागेचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. टेबल, खुर्च्या, काउंटर आदी जागांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

बुफे सेवेला परवानगी नाही

बुफे सेवेला परवानगी नसेल. जिथे शक्य असेल तिथे मेन्यूमध्ये प्री–प्लेटेड डिशेसना प्रोत्साहन देण्यात यावे. प्लेट‌्स, चमचे आदी सर्व भांडी गरम पाण्यात आणि संमत असलेल्या मान्यताप्राप्त जंतुनाशक पावडरने धुवावीत. सेवा देण्याच्या वस्तू, भांडी ही वेगवेगळी आणि सॅनिटाइज केलेल्या कपबोर्डमध्ये ठेवावीत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!