स्थैर्य, नागठाणे, दि. 20 : कोरोनाचा संकटाच्या या काळात लॉक डाउन चा हेतू यशस्वी करण्याकरता ग्राम सुरक्षा समितीची जबाबदारी महत्वाची ठरणार आहे.तसेच ग्रामस्थांनी व पर जिल्ह्यातून आलेल्या भूमीपुत्रांनी स्वयंशिस्त काटेकोर अंगिकारली पाहिजे असे प्रतिपादन तहसीलदार आशा होळकर यांनी नागठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कोरोना साथ रोग उपाययोजना आढावा बैठकीत केले.
त्या म्हणाल्या की लॉकडाऊन दरम्यान प्रत्येक गावातील ग्राम सुरक्षा समितीने वार्ड निहाय समित्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांचे प्रबोधन करावे. तसेच परजिल्ह्यातून येणार्या लोकांना कॉरंटाईन बाबत योग्य माहिती घेऊन याची नोंद वरिष्ठांकडे वेळोवेळी करावी. तसेच बेफिकीरपणे विना मास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच ग्राम सुरक्षा समितीने स्थानिक कोणतेही राजकारण न आणता प्रशासनास नेमून दिलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करावे. पार जिल्ह्यातून वैध व अवैध मार्गाने येणार्यांची सक्तीने विलगिकरन करून याची माहिती प्रशासनास सातत्याने द्यावी. तसेच कॉरंटाईन असताना देखील ज्या व्यक्ती समाजात बेफिकीर वावरत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. तसेच या प्रसंगी बोरगाव पोलीस स्टेशनचे सपोनि. डॉ. सागर वाघ यांनीही मार्गदर्शन केले. या आढावा बैठकीस नागठाणेचे जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, नागठाणे मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील तसेच नागठाणे मंडळातील सर्व गावातील ग्राम सुरक्षा समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.