
दैनिक स्थैर्य । 19 जुलै 2025 । सातारा । सज्जनगड येथे श्री समर्थसेवा मंडळाच्या वतीने माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी नुकतेच आध्यात्मिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 50 पेक्षा अधिक माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.
संस्थेचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी यांनी शिबिराचे उद्घाटन, स्वागत व मार्गदर्शन केले. अजेय बुवा रामदासी यांनी श्री समर्थ चरित्र कथा (संगीत) सांगून सर्व शिबिरार्थीना भारावून सोडले, तसेच त्यांनी पहाटेचे ध्यान सत्र घेऊन सर्व शिबिरार्थीना अंतर्मुख केले.
योगेश बुवांनी वाल्मीकी रामायणाच्या आधारे मानवी जीवनावर आपल्या सहज सुलभ शैलीने प्रकाश टाकला. हभप विलास बुवा गरवारे यांनी आपल्या सुश्राव्य कीर्तनांच्या योगे भगवद्भक्तीचे महत्त्व सांगितले.
संपूर्ण कार्यक्रमास चैतन्य गरवारे यांनी संवादिनी, श्री. पंडित यांनी तबला व अनिल बुवा प्रभुणे यांनीझांजेची अत्यंत समर्पक व प्रभावी साथ केली. त्याचबरोबर अनिल बुवा प्रभुणे यांनी गड प्रदक्षिणेच्या द्वारे शिबिरार्थीना सज्जनगडाचे माहात्म्य व इतिहास यांचे उत्तम मार्गदर्शन केले. या शिबिराचे नेटके सूत्रसंचालन, आयोजन व प्रबंधनही त्यांनी जबाबदारपणे पार पाडले.
या शिबिरासाठी राज्यसभा खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत तसेच ग्रुप कॅप्टन, वायुदल भास्कर नित्सुरे आदी आवर्जून उपस्थित होते. शिबिराबद्दल दोघांनीही गौरवोद्गार काढले. कॅप्टन अनिल प्रभुणे व माजी सैनिक दुर्गादास जाधव आदींनी परिश्रम घेतले.