शिवरायांच्या अमरावतीतील पुतळ्याची सन्मानपूर्वक प्रतिष्ठापना करा! – केशव उपाध्ये यांची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१८ जानेवारी २०२२ । मुंबई । अमरावतीमध्ये पोलिसांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांविषयीचे राज्य सरकारचे प्रेम बेगडी असल्याचे उघड झाले असून हा पुतळा अनधिकृत असल्याचे कारण देत तो हटविण्याऐवजी, त्याची तातडीने सन्मानाने अधिकृतपणे स्थापना करावी अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यावेळी उपस्थित होते.

श्री. उपाध्ये यांनी सांगितले की, अमरावतीमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी शिवप्रेमींनी स्थापना केलेला शिवरायांचा पुतळा अनधिकृत असल्याचे कारण देत तो हटविण्याऐवजी त्याची सन्मानपूर्वक योग्य त्या जागी अधिकृतपणे स्थापना करणे महाराष्ट्राच्या परंपरेस साजेसे झाले असते. पण शिवप्रेमाचे मुखवटे चढवून प्रत्यक्षात मात्र राजकारण करणाऱ्या सरकारच्या यंत्रणेने आपला खऱा चेहरा उघड केला आहे. हा पुतळा हटविताना प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एवढा बंदोबस्त अमरावतीत निघालेल्या रझा अकादमीच्या मोर्चा वेळी ठेवला असता तर अमरावतीत दंगल झाली नसती असेही त्यांनी सांगितले.

‘टेस्ला’ ला आमंत्रण देण्यापूर्वी राज्यातील स्थिती बघा

महाराष्ट्रात  उद्योगांना आवश्यक त्या पायाभूत सुविधांकरिता रखडावे लागते. रस्ते, वीज पाणी अशा मूलभूत सुविधांसाठी वणवण करावी लागते, त्यात भर म्हणून सत्ताधाऱ्यांशी संबंधितांकडून खंडणीच्या धमक्या दिल्या जातात, उद्योग विश्वात दहशत माजविण्याच्या उद्देशाने उद्योगपतींविरोधात घातपाताचे कट आखले जातात, हप्तेवसुली आणि कामगार भरतीबाबतची झुंडशाही यांमुळे अनेक उद्योग त्रस्त आहेत, अशी स्थिती असताना केवळ लोकानुनय करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण दिले. आमंत्रण देण्यापूर्वी जयंत पाटील यांनी राज्यातील स्थिती बघायला हवी होती, असा टोलाही श्री. उपाध्ये यांनी मारला.

लसीकरणाच्या वर्षपूर्तीबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन 

जगातील सर्वात वेगवान लसीकरण मोहीम राबविल्याबद्दल श्री. उपाध्ये यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अभिनंदन केले. १४ जानेवारी २०२२ रोजी या मोहिमेअंतर्गत लसीकरणाच्या १५६ कोटी मात्रा पूर्ण झाल्या असून, ९३ टक्के जनतेचे पहिल्या मात्रेचे तर ७० टक्के जनतेचे दोनही मात्रांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दररोज सरासरी ४३ लाख लोकांचे लसीकरण करणारी जगातील ही सर्वाधिक वेगवान मोहीम मोदी सरकारमुळेच देशात राबविली गेल्याने देशाला कोविडविरोधी सुरक्षेचे मोठे कवच प्राप्त झाले आहे. कालपर्यंत देशातील १५ ते १८ वयोगटातील ४३ टक्के युवकांना पहिली मात्रा पूर्ण झाली आहे, अशी माहिती श्री. उपाध्ये यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!