जिल्हाधिकारी महोदय, फलटण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना सहभागी करून घ्या; नगरसेवक सचिन सुर्यवंशी – बेडके यांची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १७ : फलटण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार दि. २०/०४/२०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित केलेली आहे. सदरची सर्वसाधारण सभा ही ऑनलाईन पध्दतीने वेबेक्स या ॲपद्वारे आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये एकूण १८ विषय चर्चेसाठी घेण्यात आले असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. सप्टेंबर २०२० पासून याच पध्दतीने फलटण नगरपरिषदेची पाचव्यांदा अशी सभा होत आहे. कोणत्याही नगरपालिकेची कोणत्याही सभेचे कामकाज हे त्या नगरपालिकेच्या अध्यक्ष किंवा अध्यक्षांचे अनुपस्थित उपाध्यक्ष यांनी चालविणे अपेक्षित असते तर या संपूर्ण सभेचे कामकाज विहीत नमुन्यात होते किंवा नाही हे पाहणे याची काळजी शासन प्रतिनिधी म्हणून मुख्याधिकारी यांनी पाहणे आवश्यक आहे. मात्र फलटण नगरपरिषदेच्या कामकाजात या सर्व नियमांची पायमल्ली होत असते. सभेच्या पदसिध्द अध्यक्ष या सभा सुरू करणे व सभा संपविणे याव्यतिरिक्त कोणतेही घोषणा करीत नाहीत तर उपाध्यक्ष व मुख्याधिकारी प्रत्यक्ष कामकाजात सहभागी होतच नाहीत. सर्व सभांचे वार्तांकन लोकांसमोर जावे यासाठी सर्व नोंदणीकृत वार्ताहर – पत्रकार यांना या सभेची अधिकृत लिंक पाठविण्यात यावी अशी मागणी नगरसेवक सचिन सुर्यवंशी – बेडके यांनी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे ई-मेल व WhatsApp द्वारे केलेली आहे.

याबाबत निवेदनात नगरसेवक सचिन सुर्यवंशी – बेडके यांनी स्पष्ट केले आहे की, नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी पक्षाचे इतर एक दोन सदस्यच सर्व विषयांचे वाचन करणे व ते विषय मंजूर झाल्याचे सांगत असतात. हे लोकनियुक्त नगराध्यक्षा यांचे अधिकारावर अतिक्रमण असून माझ्या तक्रारीत तथ्य आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आपण मागील चारही सभांचे वेबेक्स वरील चित्रीकरण तपासून पाहू शकता. यामध्ये अधिक गंभीर बाब म्हणजे शुक्रवार दि. २६/०२/२०२१ रोजी फलटण नगरपरिषद, फलटणचा सन २०२१ – २०२२ साठीची अर्थसंकल्पीय सभा राष्ट्रगीतासह केवळ तीन ते चार मिनीटात कोणतीही चर्चा न करता गुंडाळण्यात आली होती. हे फलटण नगरपरिषदेतील सत्ताबळाच्या जोरावर केलेला लोकशाहीतील लाजीरवाणा प्रकार म्हणता येईल. सबब फलटण नगरपरिषदीचे सर्वसाधारण सभेचे कामकाज विहीत नमुन्यात व योग्य पध्दतीने व्हावे यासाठी आपण स्वतः या सभेत सहभागी व्हावे तसेच या व इथून पुढच्या सभेचे वार्तांकन करण्यासाठी अधिकृत वार्ताहर व पत्रकारांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी.


Back to top button
Don`t copy text!