99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मांडलेले ठराव


स्थैर्य, 4 जानेवारी, स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत (सातारा) : 1) महाराष्ट्र सरकारने पहिली ते पाचवी पर्यंत अगोदर हिंदी भाषा विषय सक्ती लादली,नंतर त्याला सर्व स्तरावरून केलेल्या प्रचंड विरोधामुळे संबंधित निर्णय तात्पुरता मागे घेण्यात आला असला तरी तिसरी भाषा व त्या आडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न सरकारने सोडलेला नाही.उलट तिसरी भाषा लादण्यासाठी नरेंद्र जाधव समिती नेमली. ही समिती रद्द करण्याची मागणीही राज्याच्या भाषा सल्लागार समितीसह, महाराष्ट्राने एकमुखाने केली आहे. मात्र शासनाने ती समिती रद्द न करण्याचा निर्णय कायमच राखला आहे. ही जाधव समिती रद्द केली जावी. व जाधव समितीने हिंदी वा तिसरी भाषा सक्ती लादणारा अहवाल दिला तरी राज्यात कोणत्याही शाळेतून हिंदी वा तिसरी भाषा सक्ती लादली जाणार नाही याचे सरकारने अभिवचन देण्यात यावे. अशी मागणी हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक : उज्वला मेहेंदळे
अनुमोदक : रामचंद्र काळूंखे
2) राज्यातील मराठी माध्यमाच्या 14 हजार शाळा,समूह शाळाकरणाच्या नावावर समायोजित करून,बंद केल्या जाणार आहेत.त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, आदिवासी, ग्रामीण भागातील मुलांच्या, शाळांचे अंतर वाढणार आहे,अडचणी वाढणार आहेत,10 पटसंख्येपेक्षा कमी संख्येच्या शाळा बंद करणे सुरू आहे.याचा परिणाम मोठ्या संख्येने शाळाबाह्य मुले तयार होणे,शिक्षक बेरोजगार होणे हा
होतो आहे,हे तातडीने थांबवले पाहिजे,तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत प्राधान्याने बंद पडलेल्या मराठी माध्यमाच्या शाळा पुनः सुरू केल्या पाहिजेत अशी मागणी हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक : चंद्रशेखर गोखले अनुमोदक : गजानन नारे

3) महाराष्ट्रात सुमारे 40 हजार शाळांमध्ये शालेय ग्रंथपाल नाहीत, निवृत्त झालेल्यांची पदेच व्यापगत केली जातात, त्यामुळे शालेय ग्रंथालये कार्यरत असत नाहीत,मुलांवर वाचन व ग्रंथ संस्कारांची असणारी ही केंद्र जगतील यासाठी शालेय ग्रंथपालांची पदे व्यापगत न करता नवीन भरती करावी तसेच शाळांमधून नसतील तिथे शालेय ग्रंथपालांची पदे निर्माण करावीत अशी मागणी हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे .
सूचक : प्रदीप दाते  अनुमोदक : प्रतिभा सराफ

4) गेल्या दहा वर्षात,तीन भाषा सल्लागार समित्यांनी, त्यातल्या तज्ज्ञांनी,तीनदा सरकारला सादर करून झालेले मराठी भाषा धोरण जाहीर करण्याचे सरकारने टाळले आहे,ते परिष्कृत करून तज्ज्ञांच्या भाषा सल्लागार समितीने फेब्रुवारी,2022 मध्ये सरकारला सादर केले. मात्र 56 पृष्ठांचे ते संपूर्ण धोरण बाजूला सारुन, त्यातील अनेक बाबी गाळून सरकारने ते केवळ बारा पानी संक्षिप्त धोरण करून,ते मराठी भाषा धोरण म्हणून जाहीर केले.
ते,मूळ 56 पृष्ठांचे राज्याच्या तज्ज्ञ भाषा सल्लागार समितीने,फेब्रुवारी,2022 मध्ये सरकारला सादर केलेले संपूर्ण धोरण हे महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरण म्हणून तातडीने जाहीर करावे अशी मागणी हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.

सूचक :विलास मानेकर अनुमोदक :मोहन रेडगावकर

5) मराठी ही आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान इ.ची सर्व ज्ञानशाखांमधील सर्व स्तरांवरील सर्व विषयांचे अध्ययन, अध्यापन, संशोधन, रोजगार संधी,विकासाच्या संधी इ.ची माध्यम भाषा, ज्ञान भाषा व्हावी,मराठी माध्यमातून सर्व ज्ञान उपलब्ध व्हावे,म्हणून गेल्या सुमारे नव्वद वर्षांपासून मराठी विद्यापीठ व्हावे ही मागणी लावून धरली गेली आहे.
राज्याच्या भाषा सल्लागार समितीने सरकारला करून दिलेल्या राज्याच्या मूळ 56 पानी मराठी भाषा धोरणातही ती प्रतिबिंबित झाली असून तशी शिफारसही त्यात करण्यात आली आहे.
ते मराठी विद्यापीठ स्थापण्याचे टाळून, त्याऐवजी सरकारने अकारणच कोणीही न मागितलेले मराठी भाषा व साहित्य याचे एक नवीन पारंपारिक विद्यापीठ तेवढे स्थापन केले.अशा विद्यापीठ स्थापनेची मागणी कोणीही केलेली नव्हती.
त्यामुळे ज्या मराठी विद्यापीठाची मागणी मराठी भाषिक समाज गेली नव्वद वर्ष करीत आहे व ज्यासाठी 2020 मध्येच प्रस्तावित आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठाचा प्रारूप कायदा देखील कसा असावा त्याचे प्रारूप सरकारला सादर केले आहे,ती मागणी अजूनही तशीच कायमच आहे.
ते अपारंपारिक ’आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठ’ मराठी भाषा विभागानेच स्थापन करावे अशी मागणी हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे .

सूचक :दादा गोरे अनुमोदक : कपूर वासनिक

6) गेली 69 वर्षे महाराष्ट्र सीमेवरील 865 गावातील सुमारे 25 ते 30 लाख मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलने करीत आहेत. तसेच 21 वर्षांपासून माननीय सर्वोच्च न्यायालयात या संबधी दावा प्रलंबित असून कर्नाटक शासनामार्फत चालढकल करण्याचे प्रयत्न होत असल्यामुळे दाव्याबाबतची सुनावणी वेळेत होत नाही तेव्हा खेडे घटक, भौगोलिक सलगता, सापेक्ष बहुभाषिकता व लोकेच्छा या सर्वमान्य/जगमान्य तत्वांचा अवलंब करून हा वादग्रस्त सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा. अशी मागणी हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.

सूचक :प्रतिभा सराफ अनुमोदक : विलास मानेकर

7) दक्षिणेतील राज्यांनी आपल्या भाषांसाठी केला तसा,महाराष्ट्रात मराठीसाठी ,मराठी विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा कायदा करावा ही मागणी सतत लाऊन धरली गेली आहे मात्र सरकार त्याची गरज नाही असे सांगत वारंवार ती फेटाळून लावते आहे, राज्याच्या तज्ज्ञ भाषा सल्लागार समितीने देखील भाषा धोरणात हे प्राधिकरण स्थापन करण्याची शिफारस केली आहे.
हे मराठी भाषा विकास प्राधिकरण ही अर्धन्यायिक यंत्रणा तसा स्वतंत्र कायदा करून स्थापली गेल्याशिवाय मराठी विषयक कायदे, अधिनियम यांची अंमलबजावणी शक्य नाही त्यामुळे ते तातडीने स्थापन करावे अशी मागणी हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.

सूचक : गुरय्या स्वामी  अनुमोदक : डॉ. विद्या देवधर

8) मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी माणूस, मराठी संस्कृती, राष्ट्र आणि महाराष्ट्र यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी मोलाचे योगदान दिले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी जो लढा राहिला, त्यामध्ये अण्णाभाऊ साठे आघाडीवर होते. जागतिक कीर्तीचे लेखक आणि कलावंत असलेल्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘ भारतरत्न’ देण्यात यावा अशी मागणी हे 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक : मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले अनुमोदक : विनोद कुलकर्णी

9) मराठी भाषेतील अनुवाद इतर भाषांमध्ये व इतर भाषांतील मराठीत आदानप्रदान यासाठी अनुवाद अकादमी स्थापन करण्याचे सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करत अशी अनुवाद अकादमी ही शासनाची संस्था न करता साहित्य अकादमी सारखी स्वायत्त संस्था या स्वरूपात स्थापन करावी अशी मागणी हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.

सूचक :डॉ. विद्या देवधर अनुमोदक : संजय बच्छाव

10) मराठी भाषा विषय दहावी पर्यंत सक्तीचा करण्याचा कायदा झाला असला तरी मूळ मागणी तो बारावी पर्यंत सक्तीचा करण्याची होती.तशी शिफारस राज्याच्या मराठी भाषा धोरणात भाषा सल्लागार समितीने देखील केलेली आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित कायद्यात दुरुस्ती करून राज्यात सर्व बोर्डांच्या सर्व शाळांमधून मराठी भाषा विषय 12 वी पर्यंत सक्तीचा करणारी दुरूस्ती तातडीने करावी.तसेच मराठी भाषा विषय सर्व ज्ञान शाखांमधून पदवीपर्यंत शिकवला जाईल याची सोय करणारा कायदा करावा अशी मागणी हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.

सूचक :देविदास फुलारी अनुमोदक: डॉ. गजानन नारे

11) मराठीला अभिजात दर्जा दिला गेला असला तरी असा दर्जा दिला गेल्यानंतर जे सर्व लाभ केंद्राकडून मराठीला करून दिले जाणे आवश्यक आहे ते मिळवून घेण्यासाठी केंद्रावर दबाव निर्माण करण्याचे तसेच राज्याच्या पातळीवरही प्रत्यक्ष कृतिपर कार्य सरकारने करण्यासाठी एका अशासकीय तज्ज्ञांच्या समितीची स्थापना करावी तसेच केंद्राने अद्यापही अभिजात दर्जाचे कोणतेच लाभ मराठीला देणारा शासन निर्णय निर्गमित केलेला नाही,तो करून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.

सूचक :प्रा. मिलिंद जोशी

12) बडोदा आणि सुरत शहरात मिळूनच सुमारे 10 लाख एवढी मोठी मराठी भाषिकांची संख्या आहे.संपूर्ण गुजरातमध्ये त्याहून अधिक आहे.त्यामुळे महाराष्ट्रात सरकारने जशी गुजराती अकादमी स्थापन केली आहे त्याच धर्तीवर गुजरातेत मराठी अकादमी स्थापन व्हावी यासाठी यथायोग्य ते प्रयत्न महाराष्ट्र सरकारने करावेत अशी मागणी हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.

सूचक: संजय बच्छाव अनुमोदक : कपूर वासनिक

13) गोवा सरकारने ‘गोवा राजभाषा कायदा 1987’ मध्ये आवश्यक ती सुधारणा करून मराठी भाषेला ‘गोव्याची राजभाषा’ म्हणून कायदेशीर दर्जा द्यावा. सरकारी कार्यालये, महामंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी भाषेचा वापर अधिकृतपणे आणि सक्तीने वाढविण्यात यावा जेणेकरून जनतेला आपल्या भाषेतून व्यवहार करता येतील. राज्यातील सर्व अधिकृत फलक, सरकारी आदेश, निमंत्रणे कोकणीसह मराठी भाषेतून ही प्रसिद्ध करण्यात यावीत. अशी मागणी हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गोवा सरकार कडे करीत आहेत.

सूचक: रमेश वंसकर अनुमोदक : सुनिताराजे पवार

14) भारतातील ग्रंथालय चळवळीचे जनक मानल्या जाणार्‍या श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांच्या कवळाणे (ता .माळेगाव जि. नाशिक) या जन्मगावी ’नाही चिरा नाही पणती’ अशी स्थिती आहे कवळाणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ग्रंथालयाची उभारणी करण्यात यावी. तसेच त्यांचे यथोचीत स्मारक व्हावे अशी मागणी हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.

सूचक : संजय बच्छाव अनुमोदक: मोहन रेडगावकर

15) बडोदे येथे आयोजित करण्यात आलेल्या 96 व्या अ.भा.म. साहित्य संमेलनात बडोद्यातील विमानतळास श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचे नाव देण्याचा ठराव पारित करण्यात आलेला होता. यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. ती तत्काळ करावी अशी मागणी हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.

सूचक:रामचंद्र काळूंखे अनुमोदक: विलास मानेकर

16) कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुरगीतर्फे आत्तापर्यंत मराठी भाषेतील साहित्य कन्नड मध्ये आणि कन्नड भाषेतील साहित्य मराठी भाषेत अनुवादित करण्याचे कार्य करीत असून महाराष्ट्र शासनाने अनुदानासह मराठी व कन्नड या दोन समृद्ध भाषांमध्ये साहित्यिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेतर्फे कलबुरगी येथे मराठी कन्नड अनुवाद केंद्र स्थापन करण्यात यावे अशी मागणी हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे
सूचक : गुरय्या स्वामी

अनुमोदक : कपूर वासनिक

17) श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्री शहाजी महाराजांची बेंगळूरु ही जहागिरी होती. शहाजी महाराजांची समाधी कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील होदगेरे येथे असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून श्री. शहाजी महाराजांच्या समाधीस्थळी ऐतिहासिक भव्य स्मारक उभारण्यासाठी शिफारस करावी अशी मागणी हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.

सूचक :गुरय्या स्वामी अनुमोदक डॉ. दादा गोरे


Back to top button
Don`t copy text!