फलटण नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत ‘नामांतराचा’ ठराव बहुमताने मंजूर; सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

४६ विषयांवर सविस्तर चर्चा; 'ना हरकत दाखला', नवीन वाहने आणि विकासकामांवरून गाजली सभा


स्थैर्य, फलटण, दि. २५ मार्च : फलटण नगरपरिषदेत झालेल्या ऐतिहासिक सत्तांतरानंतर आज लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच सर्वसाधारण सभा अत्यंत वादळी आणि लक्षवेधी ठरली. या सभेत तब्बल ४६ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यापैकी शहरातील वास्तूंना महापुरुषांची नावे देण्याचा बहुचर्चित ‘विषय क्रमांक ९’ आणि विकासकामांना ‘NOC’ देण्याच्या ‘विषय क्रमांक २६’ वरून सत्ताधारी आणि विरोधी गटात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. अखेर नामांतराचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.

या बैठकीसाठी उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले, मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यासह सत्ताधारी ‘खासदार गटाचे’ 19 नगरसेवक आणि विरोधी ‘राजे गटाचे’ 9 नगरसेवक, तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. सुरुवातीलाच विरोधी गटाचे विकास काकडे यांनी ‘नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना अनुभव नसल्याने शासनाच्या निर्णयांची माहिती देण्यात यावी,’ अशी मागणी केली. यावर नगराध्यक्षांनी ‘प्रत्येक गोष्टीची नोंद मिनिट्स बुकमध्ये घेतली जात असल्याचे’ स्पष्ट केले.

सभेतील प्रमुख व गाजलेले विषय:

१. ‘नामांतराचा’ ठराव बहुमताने मंजूर (विषय क्र. ९):

शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि नगरपरिषदेच्या इमारती व सभागृहांची जुनी नावे (श्रीमंत मालोजीराजे, रामराजे, संजीवराजे) बदलून त्यांना महापुरुषांची (छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजमाता अहिल्यादेवी, छत्रपती सईबाई) नावे देण्याच्या प्रस्तावावर जोरदार खडाजंगी झाली.

  • विरोधकांची भूमिका: सौ. श्वेता तारळकर यांनी उपसूचना मांडत ‘नवीन वास्तूंना नावे देण्यास विरोध नाही, मात्र जुनी नावे बदलल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल,’ असे सांगून जुनी नावे बदलण्यास विरोध दर्शवला.

  • सत्ताधाऱ्यांचा आक्रमक पवित्रा: सत्ताधारी गटाचे सचिन अहिवळे यांनी विचारले, “हा सर्व समाजाच्या अस्मितेचा विषय आहे. महापुरुषांच्या समाजाची मते तुम्हाला चालतात, तर त्यांची नावे का चालत नाहीत?” सौ. मीना काकडे यांनीही याला दुजोरा दिला.

  • काकडे विरुद्ध अहिवळे: विकास काकडे यांनी ‘अहिवळे हे डॉ. बाबासाहेबांचे विचार एका जातीपुरते मर्यादित करत आहेत’ असा आरोप केला. यावर अहिवळे यांनी काकडे यांना ‘तुमचा नामांतराला होकार आहे की नकार?’ असा थेट सवाल केला, ज्यावर काकडे यांना ‘हो किंवा नाही’ मध्ये उत्तर देता आले नाही.

  • नगराध्यक्षांची भूमिका: “ही नगरपालिका सर्वसामान्यांची आहे. ज्या महापुरुषांनी हे राज्य घडवले, त्यांचा विसर पडू नये म्हणून जनभावनेचा आदर करत ही नावे देत आहोत,” असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. अखेर हा ठराव महापुरुषांच्या जयघोषात बहुमताने मंजूर झाला.

२. विकासकामांच्या NOC वरून कायदेशीर वाद (विषय क्र. २६):

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जि.प. कडील कामांना नगरपरिषदेचा ‘ना हरकत दाखला’ (NOC) देण्यापूर्वी सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्याच्या प्रस्तावावर विरोधी गटाचे अनिकेतराजे यांनी कायदेशीर आक्षेप घेतला. “एक वकील म्हणून सांगतो, हा अधिकार थेट मुख्याधिकाऱ्यांचा आहे, सभागृहाचा नाही,” असे ते म्हणाले. यावर नगराध्यक्षांनी स्पष्ट केले की, “शहरात दुबार कामे होऊ नयेत आणि आरक्षणाच्या जागांवर परस्पर कामे होऊ नयेत, यासाठी संपूर्ण सभागृहाला याची माहिती असणे आवश्यक आहे. हा नगरसेवकांचे अधिकार जपण्याचा विषय आहे.” हा ठरावही बहुमताने मंजूर करण्यात आला.

३. अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी समित्या गठीत (विषय क्र. २५):

सदस्या कु. सिद्धाली अनुप शहा यांच्या तक्रारीवरून मुख्याधिकारी निखील मोरे व रोहित जमदाडे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. रोहित नागटिळे यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्षांनी यावर ३ सदस्यीय समिती नेमून कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. तसेच, सचिन अहिवळे यांनी पाणीपुरवठा प्रकल्पातील निकृष्ट कामाचा मुद्दा उपस्थित केल्यावर, त्यावर ५ सदस्यीय समिती नेमण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले.

४. नगराध्यक्षांसाठी नवीन वाहन (विषय क्र. १३):

नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांसाठी नवीन वाहन खरेदीच्या प्रस्तावावर विरोधी गटाचे पंकज पवार यांनी ‘नगराध्यक्षांना नवीन वाहन घ्या, मात्र मुख्याधिकाऱ्यांना नको,’ अशी सूचना केली. विकास काकडे यांनी आस्थापना खर्चाचा मुद्दा मांडला. मतदानाअंती १८ विरुद्ध ८ मतांनी हा ठराव मंजूर झाला.

५. विकासनिधी व हद्दवाढ (विषय क्र. २ व १२):

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेतील कामांवरून विकास काकडे यांनी प्रभागातील निधीवाटपावर आक्षेप घेतला; मात्र नगराध्यक्षांनी ‘तुम्ही वेळेत मागणी न केल्याने प्रभाग मागे राहिल्याचे’ सांगितले (१९ विरुद्ध ७ मतांनी मंजूर). तसेच शहराच्या ‘हद्दवाढी’चा ठराव मंजूर करण्यात आला, ज्यात सौ. स्मिता शहा यांनी जाधववाडी सरहद्दीचा भाग घेण्याची सूचना केली.

सभेतील इतर महत्त्वाचे निर्णय:

  • भव्य स्टेडियम: फरांदवाडी येथील सा.बां. विभागाच्या ५.८४ हेक्टर जागेवर शहरासाठी भव्य स्टेडियम व क्रीडा संकुल विकसित करण्यासाठी जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय (विषय १५).

  • नमो उद्यान: वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरात नमो उद्यान विकसित करणे (विषय ४). वनविभागाच्या जागेचा प्रस्ताव वेळेअभावी नाकारण्यात आला.

  • रस्ते आणि सीसीटीव्ही: आगामी ६ महिन्यात शहरातील सर्व प्रमुख रस्ते सिमेंट किंवा डांबरी करणार असल्याची ग्वाही नगराध्यक्षांनी दिली. शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यास मंजुरी (विषय ३५).

  • अभय योजना: थकीत मालमत्ता करावरील दंड माफ करण्यासाठी अभय योजनेचा प्रस्ताव शासनास सादर करणे (विषय २४).

  • विद्युत व स्वच्छता: नवीन विद्युत पोल उभारणे (विषय २१), नवीन प्रसाधनगृहे बांधणे व जीर्ण मुताऱ्या पाडणे (विषय २७, ३०).

  • स्मशानभूमी सुशोभीकरण: महाराजा मल्टीस्टेटच्या सहकार्याने स्मशानभूमी सुशोभीकरण; मृतांचे नातेवाईक अंत्यसंस्काराचा खर्च करतील (विषय ३३).

  • सल्लागार व पदे: पॅनेलवर वकील नेमण्यास मंजुरी, मात्र आर्किटेक्ट नेमणुकीचा विषय त्रुटीमुळे पुढील सभेत घेण्याचे ठरले (विषय ४१).

साऊंड सिस्टीम सुधारण्याची मागणी:

सभेच्या शेवटी अझरुद्दीन (पप्पू) शेख यांनी सभागृहात नगराध्यक्ष व इतरांचा आवाज स्पष्ट येत नसल्याची तक्रार केली. यावर मुख्याधिकाऱ्यांनी पुढील सभेपूर्वी साऊंड सिस्टीम अद्ययावत करण्याचे आश्वासन दिले.

एकंदरीत, फलटण नगरपरिषदेची ही पहिलीच सभा शहरातील रेंगाळलेली विकासकामे, महापुरुषांचा सन्मान आणि सत्ताधारी-विरोधकांमधील अधिकारांच्या संघर्षामुळे ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.


Back to top button
Don`t copy text!