
स्थैर्य, फलटण, दि. ३० सप्टेंबर : “माझ्या वॉर्डमधील विकास कामांबाबत नगरपालिका कार्यालयाशी झालेल्या मतभेदांमुळे, त्या रागापोटी मी खासदार गट व भाजपचा राजीनामा देत असल्याबाबत व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले होते,” असा खुलासा फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
काल (दि. २९) पहाटे अशोकराव जाधव यांनी खासदार गटातून बाहेर पडत असल्याची घोषणा करणारे स्टेटस ठेवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, आज त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. जाधव यांनी म्हटले आहे की, “माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी याप्रकरणी सकारात्मक निर्णय घेऊन माझे सर्व गैरसमज दूर केले आहेत. त्यामुळे मी यापुढेही खासदार गट व भाजप पक्षासोबतच काम करणार आहे.”
फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी माझ्या त्या स्टेटसमुळे कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहनही अशोकराव जाधव यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.