दैनिक स्थैर्य | दि. २० जुलै २०२३ | फलटण | फलटण शहरात व तालुक्यातील बहुतांश नागरिकांना आज सकाळी १० वाजून २० मिनिटांनी भारत सरकारच्या वतीने इमर्जन्सी अलर्ट आलेला आहे. त्यामुळे अनेक नागरिक हे संभ्रम अवस्थेत आहेत नक्की काय मेसेज आहे ? हा मोबाईल हॅकिंगचा नवा फंडा आहे काय ? असे अनेक प्रश्न फलटणकरांच्या मनामध्ये उपस्थित झाले आहेत. आज रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे झालेल्या दुःखद घटनामुळे भारत सरकारच्या वतीने रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील नागरिकांना दरड प्रवण क्षेत्रात जावू नये; आपली, कुटुंबीयांची व मित्रपरिवाराची काळजी घेण्याबाबत हा इमर्जन्सी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
फोनमधील इमर्जन्सी अलर्ट फीचरमुळे यूजर्सना भूकंपाचा इशारा मिळत असतो. अशा परिस्थितीत भूकंप, चक्रीवादळ, त्सुनामी यासह इतर अनेक नैसर्गिक आपत्तींबाबत मोबाईल वापरकर्त्यांना आधीच सतर्क केले जाते. भारत सरकार पूर, आपत्ती, भूकंप यासारखी माहिती त्वरित प्रभावाने संदेशांद्वारे जारी करण्याच्या यंत्रणेवर इमर्जंसी अलर्ट हे फिचर काम करत असते.