
स्थैर्य, कोळकी, दि. 30 सप्टेंबर : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी फलटणचे उपनगर असलेल्या कोळकी गावासह पंचक्रोशीतील नागरिक पुढे सरसावले आहेत. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे जमा केलेली मदत मराठा क्रांती मोर्चा, फलटण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांसाठी मदत मोहीम राबविण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत कोळकी व परिसरातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्याच्या स्वरूपात मदत जमा केली.
ही मदत मराठा क्रांती मोर्चाच्या स्वयंसेवकांमार्फत मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात येणार आहे. कोळकी ग्रामस्थांनी या माणुसकीच्या नात्याने दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.