मुंबईतील आंदोलनानंतर फलटणमध्ये ‘आरक्षण विजयोत्सव’; छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत वाटले पेढे

ऐतिहासिक लढ्यात सहभागी झालेल्या मराठा सेवकांचा जल्लोष; शहरातील वातावरण उत्साही


स्थैर्य, फलटण, दि. ४ सप्टेंबर : मराठा आरक्षणाच्या लढ्यात मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर, मुंबईतील आंदोलनातून परतलेल्या फलटण तालुक्यातील मराठा सेवकांनी बुधवारी शहरात ‘आरक्षण विजयोत्सव’ साजरा केला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येत, महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून आणि पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघर्षयोद्धे श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या पाच दिवसीय उपोषणात फलटण तालुक्यातील हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते. राज्य सरकारने मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून मागण्या मान्य करत शासन निर्णय (जीआर) काढल्यानंतर हे आंदोलन यशस्वी झाले.

हा विजय साकार झाल्यानंतर, मुंबईत तळ ठोकून असलेले मराठा आंदोलक बुधवारी पहाटे फलटणमध्ये परतले. त्यानंतर सकाळी ठीक ११ वाजता सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले आणि त्यांनी या लढ्याच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

फलटण तालुक्यात ‘गाव तिथे मराठा क्रांती मोर्चा शाखा’ या संकल्पनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजात एकी निर्माण करण्याचे काम सुरू होते. याच एकजुटीच्या जोरावर अंतरवाली सराटीपासून ते मुंबईतील आझाद मैदानापर्यंतच्या प्रत्येक आंदोलनात फलटण तालुक्याने मोठे योगदान दिले. या ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते.


Back to top button
Don`t copy text!