
स्थैर्य, फलटण, दि. १३ ऑक्टोबर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज झालेल्या आरक्षण सोडतीत फलटण तालुक्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. सातारा जिल्हा परिषदेचे तालुक्यातील चार गट ‘अनुसूचित जाती’ (SC) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. तर, फलटण पंचायत समितीच्या १६ गणांपैकी ८ जागा महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक दिग्गजांची संधी हुकली असून, नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या गटांसाठीची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात, तर फलटण पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत येथील सजाई गार्डन येथे पार पडली.
जिल्हा परिषदेत दिग्गजांना धक्का
जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत फलटण तालुक्यातील गुणवरे, साखरवाडी-पिंपळवाडी, विडणी आणि बरड हे चारही गट अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे जाहीर झाले. या अनपेक्षित आरक्षणामुळे जिल्हा परिषदेवर जाण्यास इच्छुक असलेल्या अनेक प्रस्थापित नेत्यांना आणि दिग्गजांना मोठा धक्का बसला आहे. सर्वच गट आरक्षित झाल्याने आता राजकीय पक्षांना चारही जागांवर अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार शोधावे लागणार आहेत.
पंचायत समितीमध्ये महिलांना मोठी संधी
फलटण पंचायत समितीच्या १६ गणांपैकी ८ जागा महिलांसाठी राखीव झाल्याने, महिलांना राजकारणात मोठी संधी मिळाली आहे. आज जाहीर झालेले पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे:
पाडेगाव: सर्वसाधारण
तरडगाव: सर्वसाधारण (महिला)
साखरवाडी-पिंपळवाडी: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सस्तेवाडी: नागरिकांचा मागास प्रवर्ग
सांगवी: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
विडणी: सर्वसाधारण
गुणवरे: अनुसूचित जाती (महिला)
आसू: अनुसूचित जाती
बरड: सर्वसाधारण (महिला)
दुधेबावी: सर्वसाधारण (महिला)
कोळकी: सर्वसाधारण
जाधववाडी (फ): सर्वसाधारण
वाठार (निंबाळकर): सर्वसाधारण (महिला)
सुरवडी: सर्वसाधारण
सासवड: नागरिकांचा मागास प्रवर्ग
हिंगणगाव: सर्वसाधारण (महिला)
या आरक्षण सोडतीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, आता सर्वच राजकीय पक्षांना नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.