नगरपरिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज जाहीर; फलटणमधील राजकीय समीकरणे बदलणार?


स्थैर्य, फलटण, दि. ६ ऑक्टोबर : राज्यातील प्रलंबित असलेल्या २२६ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईत आज राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते अध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. या सोडतीमुळे फलटण नगरपरिषदेसह राज्यातील स्थानिक राजकीय समीकरणे बदलणार असून, अनेक दिग्गजांचे भवितव्य ठरणार आहे.

या सोडतीमध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) या प्रवर्गांसाठी अध्यक्षपदे आरक्षित केली जाणार आहेत. तसेच, एकूण जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनेक प्रमुख नगरपरिषदांचे अध्यक्षपद महिलांसाठी राखीव होण्याची शक्यता असल्याने, अनेक प्रस्थापित नेत्यांना पर्यायी उमेदवार शोधावा लागणार आहे.

अध्यक्षपदाचे आरक्षण आज निश्चित होणार असल्याने, गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या सोडतीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला लागणार आहेत. आता राज्य निवडणूक आयोग लवकरच निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!