
स्थैर्य, फलटण, दि. ५ ऑक्टोबर : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीनंतर आता सदस्यपदांच्या आरक्षणाचाही कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार, फलटण नगरपरिषदेसह राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्य (नगरसेवक) पदांसाठीची आरक्षण सोडत बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत काढली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी ३ ऑक्टोबर रोजी याबाबतचा आदेश जारी केला. नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत ६ ऑक्टोबर रोजी होत असून, त्यानंतर आता नगरसेवकपदांच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
असा आहे सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम:
८ ऑक्टोबरपर्यंत: जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिलांसाठी आरक्षण सोडत काढली जाईल.
९ ऑक्टोबर: जिल्हाधिकारी प्रारुप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करतील.
९ ते १४ ऑक्टोबर: प्रसिद्ध झालेल्या प्रारुप आरक्षणावर नागरिक हरकती व सूचना दाखल करू शकतील.
२४ ऑक्टोबरपर्यंत: विभागीय आयुक्त हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाला अंतिम मान्यता देतील.
२८ ऑक्टोबरपर्यंत: मुख्याधिकारी अंतिम आरक्षणाची अधिसूचना शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करतील.
या घोषणेमुळे फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे लक्ष आता ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सोडतीकडे लागले आहे. आपल्या प्रभागाचे आरक्षण काय निघणार, यावर अनेक इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.