दैनिक स्थैर्य | दि. १४ जानेवारी २०२५ | फलटण |
आजच्या तांत्रिक युगामध्ये भाषा समृद्धीसाठी शोधकार्य होणे आवश्यक आहे. भाषेच्या माध्यमातून संस्कृतीचे वहन होते. हिंदी भाषा ही मधुर व लाघवी भाषा आहे. आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे ती आज जागतिक स्तरावर पोहोचली आहे. केवळ भारतच नाही तर अनेक देशांमध्ये हिंदीचा वापर केला जातो. फिलिपिन्स, मॉरिशीयस नेपाळ, सूरीनाम, फिजी, तिब्बत, त्रिनीनाद, पाकिस्तान येथे प्रामुख्याने हिंदी भाषेचा वापर केला जातो. ‘विश्व हिंदी दिन’ साजरा करण्याने सांस्कृतिक एकात्मता स्थापित करण्यात हिंदीची महत्त्वाची भूमिका आपणास दिसून येते, असे प्रतिपादन प्रो. डॉ. अशोक शिंदे यांनी केले.
१० जानेवारी रोजी विश्व हिंदी दिनाचे औचित्य साधून मुधोजी महाविद्यालय, फलटणच्या हिंदी विभागाच्या वतीने ‘विश्व हिंदी दिन’ कार्यक्रमाचे आयोजन केलेे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे कला शाखाप्रमुख प्रो. डॉ. अशोक शिंदे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभागाध्यक्ष प्रो. डॉ. नितीन धवडे यांनी साहित्य वाचनाचे महत्त्व सांगितले. तसेच साहित्य हे उत्तम संस्कारपीठ आहे, सुजाण व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य साहित्य करते, असे ते यावेळी म्हणाले.
प्रास्ताविक डॉ. सविता नाईक निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन व संयोजन प्रा. किरण सोनवलकर यांनी केले. आभार प्रा. कु. रचना धुमाळ यांनी मानले. कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.