रा. ना. गोडबोले ट्रस्टचा उपक्रम कौतुकास्पद – विनायकराव आगाशे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑगस्ट २०२२ । सातारा । सर्व जाती धर्माच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यासाठी सातारा येथील रा ना गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट १९७१ मध्ये स्थापन झाला. आणि सलग ५१ वर्षं अशा प्रकारे मदत करत राहणे हे केवळ कौतुकास्पद नाही तर अनुकरणीय आहे असे प्रतिपादन सेवानिवृत्त सहाय्यक विक्रीकर आयुक्त विनायकराव आगाशे यांनी केले.
सातारच्या रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट या माध्यमातून यंदा दुसऱ्या टप्प्यात समर्थ सदन येथे झालेल्या कार्यक्रमात पाचवी ते नववी यातील १६० जणांना पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक मदत व वाचनीय पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विनायकराव आगाशे उपस्थित होते. यावेळी अन्य प्रमुख पाहुण्यांमध्ये उद्योजक उस्मानशेठ बागवान , आयडीबीआय ट्रस्टी चे दिलीप पाठक , सेवानिवृत्त आयकर अधिकारी जयवंत चव्हाण यांचा समावेश होता. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे प्रमुख ट्रस्टी आणि चित्रपट निर्माते अरुण गोडबोले होते.
यावेळी १६० विद्यार्थ्यांना एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांची मदत देण्यात आली. 5000 रुपयाचा मूळ फंड आता एक कोटी रुपयाचा झाला असून त्यात गोडबोले कुटुंबीय दरवर्षी भरत घालत आहेत अशी माहिती यावेळी अरुण गोडबोले यांनी दिली. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी उपक्रमाचे कौतुक करून उपस्थित विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे मोठे होऊन तुम्हीही गरजू विद्यार्थ्यांना मदत करा असे आवाहन केले.
प्रास्ताविक व स्वागत अशोक गोडबोले यांनी केले. प्रद्युम्न गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राचार्य पुरुषोत्तम शेठ ,अविनाश लेवे ,गौतम भोसले , उदयन गोडबोले , आर्यन गोडबोले ,डॉ चैतन्य गोडबोले , माधवराव गोडबोले उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!